मोदी स्वच्छ मनाचे, मात्र भाजपातील शुक्राचार्यांमुळे महाराष्ट्राच्या मदतीत आडकाठी – संजय राऊत

Sanjay Raut-PM Modi-Maharashtra Today

मुंबई :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेल्या आरोग्य विषयक सेवांच्या तुटवड्यावरुन राजकारण करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचे (Narendra Modi) यांचे   गोडवे गायले तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी कोणत्याही राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन्सची कमी भासू दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोणत्याही राज्याविषयी आकस नाही.

ते स्वच्छ मनाचे आहेत. मात्र भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहचवण्यात आडकाठी निर्माण करत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, भाजपमधील राजकीय शुक्राचार्यांनी संकटाच्या प्रसंगात महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळू नये. केंद्र सरकारने महाराष्ट्राला (Maharashtra) सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातही केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. एक दिवस उद्योगधंदे बंद राहिले तरी चालतील; पण लोकांचा जीव वाचवणे ही आजची प्राथमिकता असली पाहिजे. आता भाजपशासित राज्यांमध्ये लॉकडाऊन लावावा, यासाठी उच्च न्यायालयांना आदेश द्यावा लागणे म्हणजे परिस्थिती किती नियंत्रणाबाहेर गेली आहे हे स्पष्ट होते, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले ही खरी बाब आहे. पण मग न्यायालयाने कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना सांगाव्यात. न्यायमूर्ती वेगाने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करू शकतात का, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. त्यामुळे सध्या न्यायालयांनी सरकारच्या कारभारावर शेरे किंवा ताशेरे ओढू नयेत. बंगालच्या निवडणुकीत इतका पैसा खर्च केला जात आहे. केंद्र सरकार संपूर्ण पैसा निवडणुकीत खर्च करणार आहे. त्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे जे काही देणे असेल ते पूर्णपणे परत द्या. मागील २४ तासांमध्ये देशात तीन लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.

अनेक राज्यांमध्ये अजूनही कोरोना चाचण्या केल्या जात नाहीत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या नक्कीच यापेक्षा जास्त आहे. केंद्र सरकार सर्व जबाबदारी आता राज्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राज्यांना सांभाळण्याची जबाबदारी ही केंद्राची असते. ते आपल्या जबाबदारीपासून दूर जाऊ शकत नाही. भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पैसा उधळत आहे. मग केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जीएसटी थकबाकीचे संपूर्ण पैसे तत्काळ परत करावे. सध्याच्या घडीला महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : ‘छगन भुजबळ जे म्हणाले तेच मोदीही म्हणाले’, नवीन काहीच नाही; शिवसेनेचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button