मोदी सरकारने वाहनांसंबंधी डाटा विकून केली कोट्यवधीची कमाई- नितीन गडकरी

Nitin-Gadkari-pm-modi

नवी दिल्लीः मोदी सरकारने वाहनांची नोंदणी आणि वाहन चालविण्याच्या परवान्याचा डाटा विकून कमाई केल्याची माहिती रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

बल्क डाटा शेअरिंग धोरणानुसार खासगी कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांना डाटा एक्सेसची परवानगी दिली जाते. या धोरणा अंतर्गत सरकारने आतापर्यंत डाटा विकून ६५ कोटींची  कमाई केली आहे. सरकारने आतापर्यंत ८७ खासगी आणि ३२ सरकारी कंपन्यांना वाहनांचा डाटा विकला आहे. यासाठी शैक्षणिक संस्थेकडून एका वर्षासाठी तीन  कोटी आणि सरकारी संस्थांकडून पाच  कोटी रुपये घेतले जातात.

वाहन (VAHAN) आणि सारथी (SARATHI) हा डाटा बेस पहिल्यांदा २०११ मध्ये उपलब्ध करून देण्यात आला . या योजने अंतर्गत वाहन खरेदी करणा-या कंपन्यांना या वाहन आणि सारथी डाटाबेस एक्ससेसची परवानगी दिली जाते ज्याचा उपयोग देशभरातील आरटीओमध्ये केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचा डाटा उपलब्ध आहे.

वाहन सॉफ्टवेअरमध्ये व्हेईकल रजिस्ट्रेशन, टॅक्स, फिटनेस, चालान आणि परमिटचा डाटा उपलब्ध आहे. तर दुसरीकडे सारथी डाटाबेसमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, फीची डिटेल उपलब्ध आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर जवळपास २५ कोटी व्हेईकल रजिस्ट्रेशन आणि १५ कोटी ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती उपलब्ध आहे.