शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : ६० लाख टन साखर निर्यातीवर केंद्राकडून अनुदान मिळणार

Narendra Modi

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक्स अफेअर्सने साखर कारखान्यांना निर्यातीसाठी सबसिडी देण्याचा निर्णय दिला आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी केंद्राने ३५०० कोटी रुपये निर्यात सबसिडी देण्यास मंजुरी दिली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. अन्न मंत्रालयाने २०२०-२१ या मार्केटिंग इयरमध्ये ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ महिन्यात ६० लाख टन साखर निर्यातीसाठी ३६०० कोटी रुपयांच्या सबसिडीचा प्रस्ताव दिला होता. साखर निर्यातीने देशातील ५ कोटी शेतकर्‍यांना आणि ५ लाख मजुरांना फायदा होईल. आठवडाभरात शेतकऱ्यांना ५ हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळेल. ६० लाख टन साखर ही ६ हजार रुपये प्रतिटन दराने निर्यात केली जाईल.

केंद्र सरकारने २०१९-२० या आर्थिक वर्षात १० हजार ४४८ रुपये प्रतिटन साखर निर्यातीवर सबसिडी दिली होती. यामुळे सरकारच्या तिजोरीवर ६ हजार २६८ कोटी रुपयांचा बोजा पडला होता. चालू आर्थिक वर्षात सरकारने मागील वर्षाच्या तुलनेत कमी सबसिडी जाहीर केली आहे.

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे. मागील दोन वर्षांमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळण्यासाठी आणि कारखान्यांकडील साखरेचा साठा कमी करण्यासाठी निर्यात सबसिडी देण्याची घोषणा केली होती. या वर्षी थायलंडमधील साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. ब्राझीलमधील साखर एप्रिल २०२१ मध्ये बाजारात येऊ शकते. त्यामुळे भारताला साखर निर्यातीमध्ये चांगली संधी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER