सिरमचा ५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला

दिल्ली :- ‘कोविशिल्ड’ (Covishield) लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा प्रस्ताव मोदी सरकारने (Modi Govt.) फेटाळला. आंतरराष्ट्रीय दबाव आणि वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही केंद्र सरकारने सिरमची विनंती फेटाळून लावली आहे. सिरमकडून युकेला लस पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्याआधारे ही विनंती करण्यात आली होती.

भारतात सध्या करोनाची (Corona) दुसरी लाट जोरात आहे. देशात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहिमही रखडते आहे. यामुळे देशात निर्माण होणाऱ्या लसींचा पुरवठा सर्वात आधी राज्यांना केला जावा आणि त्यानंतरच निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी होते आहे. या स्थितीत केंद्राकडून सिरमला लस निर्यात करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा व्हावा यासाठी त्यांना सिरमशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. देशात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यांकडून मागणी होते आहे.

“कोविशिल्ड लसीचे हे ५० लाख डोस आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. राज्यांना हे डोस ताब्यात घेण्यास सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयेदेखील हे लसीचे डोस मिळवू शकतात,” असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सिरमशी संपर्क साधत लवकरात लवकर लसींचे डोस ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसींच्या कुप्यांचे लेबल बदलावे लागणार आहेत. युकेला पुरवठा करण्यासाठी पँकिंग करण्यात आल्याने त्यांच्यावर वेगळे लेबल होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button