मॉडेल, अभिनेता व फिटनेस फ्रीक मिलिंद सोमण याने टिकटॉक अकाउंट केला बंद

वांगचुक यांच्या व्हीडीओत जास्त बदल करणे शक्य नाही.

Milind Soman - Sonam Wangchuk

मिलिंदने टिक टॉक अकाउंट बंद केल्याची घोषणा ट्विटवरुन केली आहे. प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून टिकटॉक अकाउंट बंद करत असल्याचे मिलिंदने म्हटले आहे.

२०१८ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणारे वांगचुक यांनी युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात लक्षात आणून दिले आहे की, भारतीय खूप मोठ्या प्रमाणात चीनला प्रत्यक्षपणे आर्थिक मदत करत असतात. एकीकडे भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळूरू आणि देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे असे आवाहन वांगचुक यांनी केले आहे.

आठवड्याभरात चिनी सॉफ्टवेअर वापरने बंद करा आणि वर्षभरामध्ये चिनी हार्डवेअर म्हणजेच इलेक्ट्रीक उपकरणे वापरणं बंद करा असे आवाहन वांगचुक यांनी केले आहे. टिक टॉक या लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप्सचे सर्वाधिक वापरकर्ते (युझर्स) भारतामध्ये आहेत. २०१९ साली जून महिन्यात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात १२ कोटी भारतीय हे अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे. सध्या भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावामुळे चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यमातून केले जाते आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना मलिंदने ट्विट केलं आहे – मी आता टिक टॉकवर नाही. या ट्विटसोबत त्याने वांगचुक यांच्या व्हिडिओची लिंक पोस्ट केली आहे.

कोरोनाचा संसर्ग चीनमधील वुहानमधून जगभरामध्ये झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेक देशांमध्ये चीनविरोधात राग आहे. याचा फायदा घेऊन आपण चीनला आर्थिक धक्का देऊ शकतो असे मत वांगचुक यांनी व्यक्त केले आहे. टिक टॉकचे गुगल प्लेवरील रेटिंग मागील काही आठवड्यात झपाट्याने उतरले होते.

कोरोनामुळे चीनचे आर्थिक कंबरडे मोडले असून आता चीन पुन्हा उभा राहण्यासाठी धडपडतो आहे. चीनचा जीडीपी मोठ्या प्रमाणात पडला आहे. तेथे मोठ्याप्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे. या असंतोषाचा उद्रेक होऊ नये म्हणून चीन आजूबाजूच्या देशांशी काही ना काही वाद उकरून काडत आहे. या वादात चीनची बाजू घेण्यासाठी नागरिक सरकारच्या पाठीशी उभे राहतील अशी चीनची व्यूहरचना आहे, असे वांगचुक म्हणाले.

आपल्या देशातील १३० कोटी जनता आणि परदेशातील तीन कोटी भारतीयांनी एकत्र येऊन देशात आणि जगभरामध्ये चिनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केली तर त्याला जगभरातून प्रतिसाद मिळू शकतो. आज जगभरामध्ये चीनविरोधी वातावरण आहे. जगभरामधून चिनी सामानावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली तर चीनची भिती सत्यात उतरेल आणि तेथील अर्थव्यवस्था कोसळेल. सामान्य लोक रस्त्यावर येऊन विरोध नोंदवतील आणि त्या माध्यमातून चीनमध्ये सत्तांतर होईल. असे झाले नाही तर दुर्देवाची गोष्ट असेल कारण एकीकडे आपले सैनिक चीनविरोधात सीमेवर लढत असतील तर दुसरीकडे भारतीय नागरिक मोबाइलपासून ते लॅपटॉपर्यंत आणि कपड्यांपासून खेळण्यांपर्यंत चिनी वस्तूंचा वापर करुन चीनच्या सैन्याला पैसा पुरवत आहेत, असे वांगचुक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER