
कोल्हापूर : कळंबा कारागृहाची (Kalamba jail) सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. कारागृहात चार मोबाईल आणि गांजाचा मोठा साठा आढळून आल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध राजवाडा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही कडेकोट पहारा असलेल्या कळंबा कारागृहात मोबाईल आणि गांजासह अमलीपदार्थांचा साठा सापडला होता.
काल, मंगळवार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्कार्पियोमधून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी कापडाचे तीन पुडके संरक्षक भिंतीच्या कड्यावरून कारागृहात फेकून दिले होते. हा प्रकार कारागृह रक्षक रवींद्र भाट यांच्या निदर्शनास आला होता. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सी. सी. टीव्ही फुटेजद्वारे संशयित आणि वाहनांचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. आज बुधवारी दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापडाच्या पुडक्यात चार मोबाईल, अर्धा किलो वजनाचा गांजा, दोन मोबाईल सिम कार्ड, पेन ड्राईव्ह असा सुमारे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बहुचर्चित ठरलेल्या कळंबा कारागृहात गांजा आणि अमलीपदार्थ साठा आणि मोबाईल आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कारागीर रक्षकांनी सकाळी कळंबा कारागृहात सर्व सेलची कसून तपासणी केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला