मोबाइलवरून मतदान करण्याचे यंत्र विकसित

Mobile Voting Device

अल्लापुझ्झा (केरळ) : केरळच्या अल्लापुझ्झा जिह्यातील मुहम्मा येथील सी.एस. ऋषिकेष या ४६ वर्षांच्या स्वशिक्षित अभियंत्याने मतदारांना प्रत्यक्ष   मतदान केंद्रावर न जाता मोबाईल फोेनच्या साह्याने कुठूनही मतदान करता येऊ शकेल, असे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र विकसित केले आहे.

ऋषिकेष यांच्या म्हणण्यानुसार मतदाराचा मोबाईल क्रमांक निवडणूक आयोगाकडे आधीपासून नोंदविलेला असेल तर या यंत्राच्या साह्याने मतदार कुठूनही मतदान करू शकेल. निवडणुकीच्या वेळी त्याचा मोबाईल व मतदान केंद्रावरली मतदान यंत्र यांची सांगड घातली जाईल. मोबाईलवरून केल्या जाणाºया या मतदानावर निवडणूक अधिकाºयाचे संपूर्ण नियंत्रण असेल.

यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविताना ऋषिकेष सांगतात की, मतदाराने त्याच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवरून फोन केला की, मतदान केंद्रावरील मतदान अधिकारी फोन करणाºयाची ओळख पटविण्यासाठी शहानिशा करेल. त्यांची खात्री पटली  की ते आपल्या समोरील मतदान पॅनेलवरील ‘अलाऊ’ बटण दाबतील. लगेच मतदाराला त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर मतदानयंत्रावर दिसते तशी उमेदवार व त्यांचे निवडणूक चिन्ह यांची यादी दिसू लागेल. मतदार मोबईल फोनच्या कीबोर्डचा उपयोग करून यापैकी पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकेल. एकदा दिलेले मत बदलता येणार  नाही किंवा ते मागेही घेता येणार नाही. तसेच एकदा मत देऊन झाले की, त्या मतदाराचा पुन्हा मतदान यंत्रशी संपर्कही प्रस्थापित होऊ शकणार नाही. मतदाराने कोणाला मत दिले हे कोणालाही न कळता ते मतदान यंत्रात नोंदविले जाईल.

सध्या या यंत्रात जास्तीत जास्त नऊ उमेदवारांची नावे व निवडणूक चिन्हे एका वेळी दिसू शकतील, अशी सोय आहे. ही संख्या वाढविण्याचा आपला प्रयत्न आहे, असे ऋषिकेष म्हणतात. ऋषिकेष यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविले असता ते त्याच्या उपयुक्ततेविषयी प्रभावित झाले. मात्र हे यंत्र निवडणुकीत वापरण्यासाठी ऋषिकेष यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाशी संपर्क साधावा, असे त्यांना सांगण्यात आले.ऋषिकेष यांच्या या यंत्राचा आपण केंद्र सरकार व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करू, असे अल्लापुझ्झाचे लोकसभा सदस्य ए.एम. आरिफ यांनी सांगितले.

ऋषिकेष यांनी इयत्ता ११ वीनंतर औपचारिक शिक्षण सोडले असले तरी विज्ञान आणि खास करून इलेक्ट्रॉनिक्स या विषयात त्यांना नैसर्गिक गती असून त्यांनीअनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे विकसित करून ती विज्ञान प्रदर्शनात  प्रदर्शित केली आहेत. दिल्लीतील विज्ञान प्रदर्शनात दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ऋषिकेष यांचे विशेष कोतुक केले होते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER