नाशिकमध्ये भाजपला मनसेची साथ, आता राज्याच्या राजकारणातही हाच फार्मुला राहणार?

Devendra Fadnavis - Raj Thackeray

नाशिक :- नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किंगमेकरची भूमिका साकारत भाजपला साथ दिली. तर शिवसेनेने उमेदवारच न दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरली. शिवसेनेच्या तटस्थ भूमिकेमुळे भाजप उमेदवार गणेश गीते हे पुन्हा एकदा स्थायी समितीच्या सभापतीपदी निवडून आले. गीतेंच्या बिनविरोध निवडीमुळे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपच्याच ताब्यात राहिल्या आहेत. आता मनसे (MNS) आणि भाजपचा (BJP) हा फार्मुला राज्याच्या राजकारणातही वापरला जाणार, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

भाजपने गणेश गीते यांना स्थायी समितीच्या सभापतीपदी दुसऱ्यांदा संधी दिली आहे. मनसेने भाजपला साथ दिल्याने भाजपचा सभापती होणार हे आधीपासूनच निश्चित मानले जात होते. तर शिवसेनेने यापूर्वीच घोडेबाजार टाळण्यासाठी उमेदवार न देण्याची घोषणा केली होती. शिवसेनेने तलवार म्यान केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काहीहीबोलण्याच्या मनस्थितीत नाही. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचेही प्रत्येकी 8 सदस्य असल्यामुळे नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत चुरस वाढली होती. त्यामुळे या निवडणुकीत मनसे किंगमेकरच्या भूमिकेत होती. काही दिवसांपूर्वी सांगली महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत आलेल्या अनुभवामुळे भाजप सावध झाली होती. भाजपने खबरदारी घेत भाजपने स्थायी समितीच्या आठही सदस्यांना गुजरातमध्ये हलवले होते.

दरम्यान, भाजप-शिवसेनेचे संबंध आता पूर्णपणे ताणले गेलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपने मनसेला जवळ करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याचाच प्रत्यय सध्या नाशिकमधे दिसून आला. स्थायी समितीच्या निवडणुकीत सेनेला शह देण्यासाठी मनसेने भाजपला टाळी देण्याचा निर्णय घेतला. गेल्या महापौरपदाच्या निवडणुकांवेळीही मनसेने भाजपला मदत केली होती. आता पुन्हा एकदा भाजप मनसे स्थायी समिती निवडणुकीत एकत्र येत असल्याने ही राज्याच्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ही बातमी पण वाचा : मी नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन ; शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER