सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? मनसेच्या बाळा नांदगावकरांचा ‘ठाकरे सरकार’वर हल्लाबोल

bala nandgaonkar-CM Thackeray

मुंबई : राज्य सरकारने राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत . मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला.

‘राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे ‘खुजेपण’ ठळकपणे दाखविणारा आहे. चीड या गोष्टीची येते की, यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

बाळा नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट :
सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यात राजसाहेब यांचेही नाव आले. सरकार कोणाचेही असो वास्तवाचे भान ठेवून असे निर्णय घ्यायला हवे. राज्यातील जनतेसाठी सतत उपलब्ध असणारा नेता, स्वतःच्या पक्षाचा फायदा-नुकसान याचा विचार न करता स्पष्ट भूमिका घेणारा नेता, सामान्य लोकांच्या भल्यासाठी अनेकांशी भिडणारा नेता म्हणून राजसाहेब पूर्ण राज्याला माहीत आहे. साहेबांच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत; परंतु साहेबांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही.

साहेबांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत. सरकार दरबारी जी कामे होत नाहीत किंवा ज्या विषयांना मतपेटीसाठी टाळले जाते असे अनेक विषय राज दरबारी निकालात निघतात. साहेबांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे ‘खुजेपण’ ठळकपणे दाखविणारा आहे.

चीड या गोष्टीची येते की, यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील १० बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती. सरकारने जनतेला गृहीत धरू नये, ये पब्लिक है ये सब जानती है, अशा शब्दांत बाळा नांदगावकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER