
मुंबई :देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्याही मोठ्या झपाट्याने वाढत आहे. एकीकडे रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत तर दुसरीकडे रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकामिळत नसल्याने मोठे हाल होत आहे. रुग्णवाहिकांची ही अडचण लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने’ मुंबईतील प्रत्येक वॉर्डात १२ मोफत टॅक्सी रुग्णवाहिका देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेला सादर केला आहे. यासाठी टॅक्सीत आवश्यक त्या सुधारणा करून रुग्णांना मोफत सेवा देण्याची तयारी मनसेने केली आहे.
एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे महापालिका १०८ क्रमांकाच्या माध्यमातून चालवत असलेल्या रुग्णवाहिकांमधील ३२ चालकांना करोनाची लागण झाली आहे. बेस्टच्या काही बसेसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले असून आता उबर टॅक्सीच्या माध्यमातून सुमारे ४५० रुग्णवाहिका मुंबईत चालविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. तथापि या रुग्णवाहिका वेळेत मिळणे हे दिव्य असल्याचा रुग्णांचा अनुभव आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने नेमकी ही अडचण ओळखून त्यांच्या संघटनेतील टॅक्सी व रिक्षा चालकांची बैठक घेऊन टॅक्सी-रिक्षा रुग्णवाहिकांची संकल्पना मांडली” असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. “आमच्या संघटनेतील जवळपास हजाराहून अधिक रिक्षा टॅक्सी चालकांनी या उपक्रमाला मान्यता दिल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव आम्ही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना भेटून दिला. यानंतर सुरेश काकाणी यांनी टॅक्सीमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील असे सुचवले त्यानुसार आम्ही बदल करण्याची तयारीही केली आहे. आम्ही प्रत्येक विभागासाठी १२ टॅक्सी व रिक्षा तयार ठेवल्या आहेत. या रुग्णांना मोफत रुग्णालय वा क्वारंटाईन केंद्रात रुग्णांना पोहोचवतील” असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मनसेच्या या प्रस्तावाला पालिकेने मान्यता दिलेली नसली तरी लवकरच ती मिळेल व करोना असलेल्या व नसलेल्या सर्व रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल होता येईल असे संदीप देशपांडे म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला