मनसे 23 जानेवारीच्या अधिवेशनात नवे वादळ निर्माण करण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अधिवेशन येत्या 23 जानेवारी रोजी मुंबईत होत असून सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तब्बल 1 लाख कार्यकर्ते या मेळाव्याला येणार असल्याचा दावा मनसेकडून केला जात आहे.

या मेळाव्यात राज ठाकरे हे पक्षाचा नवा झेंडा जाहीर करणार आहेत. या मेळाव्याचे नवे पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. पोस्टरवर भगव्या रंगात महाराष्ट्राचा नकाशा दाखविण्यात आलाय. आधीचा पंचरंगी झेंडा पोस्टरवरुन गायब झाला आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज ठाकरे अधिवेशनात पक्षाचे नवे धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचे चिन्ह असलेले इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी ‘शिवराजमुद्रा’ असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचे म्हटले जात आहे.

राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेना भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेनाला आपली कडवी भूमिका थोडी मवाळ करावी लागली होती. त्यामुळे शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी मनसे नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान मनसेच्या या नव्या भगवीकरणावर पुण्याच्या शिवसैनिकांनी चक्क स्वागत केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती आहे. यादिवशी मनसेचे महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे. याच दिवशी आता राज ठाकरे मराठी अस्मितेसोबतच हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत.