‘मुंबईला दोन नाही तर चार आयुक्तांची गरज’, मुंबईच्या विकासासाठी मनसेने घेतली भूमिका

MNS - BMC

मुंबई :- मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा मोठा विस्तार व वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC) दोन आयुक्त असणं गरजेचे आहे, अशी मागणी काँग्रेसचे (Congress) नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी शनिवारी दिली. तर मुंबईमध्ये आधीच मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर अशा तीनही भागांची जबाबदारी तीन अतिरिक्त आयुक्तांवर सोपवलेली असताना दुसऱ्या आयुक्तांची गरज नाही. मुंबई महापालिकेच्या कायद्यातच मुळात अशा पद्धतीची तरतूद नाही, असं प्रतिपादन काँग्रेस नेते आणि मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी केलं आहे.

त्यातच अस्लम शेख यांची मागणी म्हणजे मुंबईचे दोन तुकडे करण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपचे (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. आशिष शेलार यांनीही मुंबई महापालिकेच्या कायद्याबद्दल माहिती देत असताना अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही. तेव्हा हा केवळ मुंबई तोडण्याचा डाव आहे आणि शिवसेनेची प्रतिक्रिया ही केवळ धूळफेक करणारी आहे, असा हल्लाबोल शेलार यांनी केला.

मात्र, मनसेनं वेगळीच भूमिका घेत मनसेचे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुंबईला दोन नाही तर चार आयुक्तांची गरज असल्याचं मत व्यक्त केले आहे. मुंबई महापालिकेचा कारभार हा जास्त असून कामाचे विभाजन झाले तर लोकांचे काम लवकर होईल. मुबईचा विकास होईल, त्यासाठी दोन नाही तर चार आयुक्तांची गरज असल्याचं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका केवळ एक वर्षावर येऊन ठेपल्या असताना अशा पद्धतीच्या मागण्या होऊ लागल्याने राज्याच्या राजधानीतील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे.

ही बातमी पण वाचा : …तर भंडा-याची दुर्घटना टाळता आली असती – मनसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER