नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेही; ९ मार्चला राज ठाकरेंची तोफ धडाडणार

Raj Thackeray

नवी मुंबई :राज ठाकरे यांनी हिंदुत्वाला जवळ करत पक्षाच्या उभारणीसाठी जय्यत तयारी केली आहे. येत्या ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा नवी मुंबईत होणार आहे. विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी इथे हा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांना लक्ष करतील अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा मनसेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

अजित पवारांच्या समयसूचकतेमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढावणारी नामुष्की टळली

पक्ष स्थापनेनंतर मनसेने २०१० साली नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती; मात्र यश मिळाले नव्हते. २०१५ साली मनसेने नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवली नाही. आता मात्र एप्रिल २०२० मध्ये होणारी निवडणूक ताकदीने मनसे लढवणार आहे. तसे संकेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या नवी मुंबईतल्या पश्चिम महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमात उपस्थित असताना दिले आहेत.

मनसे नेते अमित ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत अधिकच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. पक्षाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या आंदोलनात आणि कार्यक्रमात सातत्याने सहभागी होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा नवी मुंबईतला वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसांत मनसे-भाजपा जवळीक वाढलेली पाहायला मिळतेय. त्यामुळे मनसे स्वबळावर निवडणूक लढणार की भाजपासोबत जाणार, असा प्रश्न आता नवी मुंबईतील नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.