‘जिथे भेळ, तिथे खेळ’, ‘खाऊ तिथे, आम्ही जाऊ’, बागुलांच्या शिवसेना प्रवेशावर मनसेचा टोला

Bala Nandgaonkar

मुंबई : भाजपमधून (BJP) शिवसेनेत प्रवेश केलेले वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) या नेत्यांवर मनसेने अप्रत्यक्षपणे टोलेबाजी केली आहे. शिवसेनेत (Shiv Sena) आलेल्या या दोन्ही नेत्यांची वृत्ती ‘खाऊ तिथे आम्ही जाऊ’, अशी आहे. ‘जिथे भेळ तिथे खेळ’, असं यांचं राजकारण असल्याचा टोला मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर यांनी लगावला आहे. बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून सुनील बागुल आणि वसंत गीते यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील काही ‘अतिशय मोठे’ नेते बोलले की, नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे तेच ‘मोठे नेते’ आहेत ज्यांनी मनसेची चलती असताना सेना सोडली, भाजपची सत्ता असताना मनसे सोडली, सेनेची सत्ता असताना परत भाजप सोडली. एवढ्या ‘निष्ठावंत’ नेत्यांवर काय बोलणार ! यांचे ‘जिथे भेळ तिथे खेळ’ अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो. शक्यतो वैयक्तिक शेरेबाजी करणे राजकीय जीवनात कायमच टाळत आलो; परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहात नाही म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते.

त्यांना खूप  शुभेच्छा व एकच मैत्रीपूर्ण सल्ला, आता तरी गेल्या घरी सुखी राहा, असा चिमटा नांदगावकर यांनी काढला आहे. दरम्यान, दोन दिवासांपूर्वीच गीते आणि बागुल यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने नाशिकचे राजकीय समीकरण बदलणार असल्याचे म्हटले जात आहे. आगामी काळात गीते आणि बागुल यांच्यावर दिल्या जाणाऱ्या जबाबदारीवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER