लोकल प्रवासावरून मनसे-शिवसेना आमने-सामने, उद्या कोणाची सरशी होणार?

RAj Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई : कोरोना (Corona) साथीच्या रोगामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलची सेवा जवळपास ६ महिन्यांपासून बंद होती. मात्र मिशन बिगेन (Mission Begin) अंतर्गत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांपासून लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. परंतुइतर चाकरमान्यांना यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकांचे रोज मेगाहाल होत आहेत. लोकलसेवा (Localseva)सर्वसामान्यांसाठी बंद असल्यानं बसमधून प्रवास करताना सर्वसामान्य मुंबईकर मेटाकुटीला आला आहे.

या अनुषंगाने सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केली आहे. मात्र, त्यावरुनच सत्ताधारी शिवसेना (Shivsena) आणि मनसेत खडाजंगी उडाली आहे. लोकल सेवा सुरु करण्यावरुन मनसे-शिवसेना आमने-सामने आल्याने येणाऱ्या काळात राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत. कारण उद्यापासून सविनय कायदेभंग करत लोकलने प्रवास करणार, असा थेट इशारा मनसेने दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे उद्या कोणाची सरशी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून मनसेकडून केला जात आहे. आता मनसेच्या लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीवर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी संसर्ग वाढला तर मनसे जबाबदारी घेणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एसटी पूर्ण क्षमतेनं सुरु केली आहे, तर त्या प्रवाशांची जबाबादारी घेतली का? असा प्रतिप्रश्न विचारला आहे.

६ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरु करावी, यासाठी मनसे आणि सत्ताधारी शिवसेना सतत आमने सामने येत आहेत. लोकल सुरु केल्यावर कोरोनाचा संसर्ग वाढल्यास मनसे जबाबदारी घेणार का? असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. मात्रा आता एसटी बससेवा पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानं मनसेनंही त्याच शब्दात शिवसेनेवर पलटवार केला.

लोकलसेवा पूर्ववत करण्याची सध्या तरी सरकारची तयारी नाही. मात्र, दोन दिवसांआधीच सविनय कायदेभंगाचा इशारा दिल्याप्रमाणं, मनसेनं सोमवारी कार्यकर्त्यांसह लोकलनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते संतोष धुरी यांनी घरात बसून सरकार चालवणाऱ्यांना काय कळणार? असा प्रश्न विचारला. तसेच आम्ही सोमवारी लोकलनं प्रवास करण्यावर ठाम असल्याचं सांगितलं.

सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी सध्या काही लोकल धावतायत. मात्र त्यातही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून लोकलमध्ये आधीप्रमाणंच गर्दी दिसून येत आहे. तर इकडे बेस्ट बसेसची स्थिती त्याहूनही वाईट आहे. मुंबई आणि मुंबई शेजारील कल्याण डोंबिवलीपासून ते इकडे वसई विरारपर्यंत सार्वजनिक वाहतुकीचेही तीन तेरा वाजलेत. लोकल बंद असल्यानं बस हा एकच पर्याय सर्वसामान्यांसमोर आहे. मात्र बसमध्ये चढण्यासाठीच दोन चे अडीच तास रांगेत उभं राहावं लागत आहे. त्यानंतर खड्ड्यांमुळं प्रवासाचे ३ तास आणि नंतर ९ तास ड्युटी असा प्रवाशांचा वेळ खर्च होत आहे. त्यामुळं सरकारनं ही बाबही नीट समजून घेतली पाहिजे, असं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER