लाचारीचा तिटकारा असणाऱ्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारावे – मनसे

Sandeep Deshpande-uddhav-raj thackeray

मुंबई :- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिदिनी म्हणजेच येत्या 23 जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले महाअधिवेशन मुंबईत होणार आहे. या महाअधिवेशनापूर्वी मनसे मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. मनसे सोडून गेलेले हर्षवर्धन जाधव नुकतेच राज ठाकरे यांना भेटले होते. त्यामुळे राज ठाकरेंना सोडून गेले जुने शिलेदार पुन्हा मनसेमध्ये परत येणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

त्यातच, लाचारीचा तिटकारा असणाऱ्यांनी राज ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारावे अशा आशयाचे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. ‘ज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे. मराठा तितुका मेळवावा…महाराष्ट्र धर्म वाढवावा,’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

पक्षाला नवी उभारी देण्यासाठी सोडून गेलेल्या शिलेदारांना पुन्हा मनसेत आणण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. त्याचबरोबर प्रकाश महाजन यांनाही राज ठाकरे यांनी भेटायला बोलावलं होतं.

या भेटीनंतर, 23 तारखेच्या अधिवेशनात मनसेत मोठ्या इनकमिंगची शक्यता आहे. राज ठाकरे यांचा हिंदुत्व मुद्दा पटला म्हणून मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे. असे प्रकाश महाजन यांनी स्वतःच सांगितले आहे.

तर, हर्षवर्धन जाधव म्हणाले, राज ठाकरेंनी भेटीचे आमंत्रण दिले होते, त्यानुसार आमची भेट झाली. गेल्या अनेक काळापासून आम्ही संपर्कात नव्हतो. या काळातील बऱ्यात विषयांवर चर्चा झाली. मी परत यायचं की नाही यासाठी विचार करायला मला वेळ हवा आहे. मी लवकरच निर्णय जाहीर करतो.

दरम्यान, मनसेच्या महाअधिवेशनाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबई 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी मनसेचा हा महामेळावा होत आहे. या महावेळाव्यात राज ठाकरे हे पक्षाची नवी दिशा महाराष्ट्रापुढे मांडणार आहेत.

राज ठाकरे यांच्यामुळेच राऊत ‘सामना’त; अन्यथा कारकुनी करताना दिसले असते – मनसे