हे सरकार फार काळ टिकणार नाही : राज ठाकरे

Raj Thackeray

मुंबई : ” महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो, एकमेकांना विचारलं जात नाही ते जास्त काळ टिकणार नाही.” असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझे व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त टीव्हीवर दिसले, कारभार दिसला नाही – राज ठाकरे

“राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) हटवून सर्व सुरळीत केले जावे. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय; पण लोकांना याविषयी घेणे-देणे नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की, आम्हाला यातून सोडवा.” असेही ते म्हणाले.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांचं सरकार आलं होतं. तेव्हाच मी सांगितलं होतं, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकणार नाही असं वाटतं. या सरकारमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी संवाद नाही. ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार लवकर जाईल, असे वाटते, असे राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री हे शासकीय पदावर आहेत. त्यांनी बाहेर पडून काम केलंच पाहिजे. मला गेले काही महिने मुख्यमंत्री केवळ टीव्हीवरच दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. आता कुठे ते कामकाजाला सुरुवात करत आहेत. त्याबद्दल काही अधिक बोलावंसं वाटत नाही, असे ते यावेळी म्हणाले.

माझ्या मनातील महाराष्ट्र कसा असेल हे मी महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडून सांगितलं आहे. माझ्या हातात सत्ता आल्यावरच महाराष्ट्र कसा असावा ते दाखवता येईल. त्याशिवाय महाराष्ट्र कसा घडवता येईल? जगाला हेवा वाटणं हे माझं स्वप्न आहे. त्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यायला हवा, असं सांगतानाच मला जे वाटतं ते आताच्या सरकारमधील लोकांना सांगून काय उपयोग? ते त्यांच्या पद्धतीने सत्ता राबवत आहेत. माझ्या मतानुसार त्यांनी काही करावे, अशी अपेक्षा करणं बरोबर नाही, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER