मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत; त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी साधलेला संवाद

Raj Thackeray Press Confrerence

१) शहरात ‘हिंदू जननायक’ राज ठाकरे, असे  होर्डिंग्स लागले असले तरी हा उल्लेख एका वृत्तवाहिनीने माझ्या ९ फेब्रुवारीच्या महामोर्च्याच्या वेळी केला होता हे प्रथम लक्षात घ्या आणि तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी माझा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा काही माझ्या सहकाऱ्यांनी केला, ज्यावर मी दुसऱ्याच दिवशी सांगितलं की, असा उल्लेख करू नका.

२) महाराष्ट्राचा इतिहास आहे की, राजकीय भूमिकांवर जरी मतभेद असले तरी त्याचं रूपांतर व्यक्तिगत हेव्यादाव्यांमध्ये होत नाही; मध्यंतरी मी शरद पवारांना भेटलो ते ईव्हीएमच्या संबंधीच्या काही मुद्द्यांवरून भेटलो होतो; पण आपल्याकडे कोणी कोणाला भेटलं की लगेच माध्यमंच राजकीय मैत्री सुरू झाल्याच्या बातम्या सुरू करतात.

३) कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास व्हायला हवा आणि तो शेवटपर्यंत तपास व्हायला हवा. तो मध्येच थांबू नये इतकंच. बाकी तो कुठल्या यंत्रणांकडून होतोय ह्यापेक्षा तो नीट व्हायला हवा इतकाच माझा मुद्दा आहे.

४) मनसे भूमिका बदलते हे तुम्ही जरी म्हणत असलात तरी ते मला मान्य नाही. एक उदाहरण देतो, पाकिस्तानी कलाकारांना हिंदुस्थानातील चित्रपटसृष्टीत काम करू देण्याला विरोध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यशस्वी केला होता. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या कुठल्याही पक्षाने ह्याला विरोध केला नव्हता. रझा अकादमीच्या लोकांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत फक्त मी दाखवली. मशिदींवरचे भोंगे काढले पाहिजेत हे गेले अनेक वर्षे  बोलणारा मी एकमेव आहे.  मुंबईत अनधिकृतपणे बांग्लादेशी टॅक्सी, रिक्षा चालवत होते.  त्यावेळी आमच्या आंदोलनामुळे त्या टॅक्सी, रिक्षा कापल्या गेल्या. ह्या सगळ्या वेळी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारा पक्ष कुठे होता? का नाही ते आंदोलनात सहभागी झाले? माझ्या झेंड्यात जरी आज बदल झाला असला तरी माझ्या पक्षाची भूमिका ही आधीपासून हीच आहे.


सौजन्य : tv9

५) मी माझ्या २३ जानेवारीच्या महाअधिवेशनच्या भाषणात जे म्हणालो होतो तेच मी पुन्हा आज सांगतोय, माझ्या मराठीला जर नख लावाल तर मराठी म्हणून नख लावणाऱ्यांच्या अंगावर जाईन आणि हिंदुत्वाला नख लावायचा प्रयत्न केलात तर हिंदू म्हणून अंगावर जाईन. तेच मी पुन्हा सांगतो.  त्यामुळे मराठीचा मुद्दा सोडला आणि हिंदुत्वाचा धरला असं काही नाही.

६) बरं ज्यांनी भूमिका बदलली आणि सत्तेत जाऊन बसलेत त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. आणि जो झेंडा मी आत्ता घेऊन आलोय तो झेंडा मी काही वर्षांपूर्वी शिवजयंतीला आणला होता, फक्त तो पक्षाचा अधिकृत झेंडा करायचा ह्यावर आमची चर्चा गेले एक वर्ष सुरू होती. निवडणूक आयोगाला आम्ही आमच्या पक्षाचा हादेखील झेंडा आहे हे तीन वर्षांपूर्वी अधिकृतपणे कळवलं होतं. फक्त त्याचं अनावरण २३ जानेवारीला केलं इतकंच.

७) हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला म्हणजे विकासाकडे आता दुर्लक्ष केलं असं होत नाही. शहरांचा विकास करणं, ती शहरं घडवणं हा माझ्यासाठी राजकीय विषय नाही तर तो माझ्या पॅशनचा विषय आहे. जगातील अनेक शहरं मी जेव्हा पाहतो तेव्हा तिथल्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रातल्या शहरात असाव्यात असं मला वाटत राहतं.  म्हणून मी नाशिकमध्ये त्यातल्या अनेक गोष्टी घडवून दाखवल्या; पण माझ्या एक लक्षात आलं की, नाशिकमध्ये लोक विकासाला मत देत नाहीत.

८) झेंड्यावरची राजमुद्रा ही प्रेरणा आहे आणि ती प्रेरणा म्हणूनच आम्ही बघतो. त्याचा वापर कधीही निवडणुकीच्या काळात करायचा नाही हे मी स्पष्ट केलं आहे. निवडणुकीच्या वेळेस पक्षाचं चिन्ह असलेला झेंडाच वापरला जाईल.