अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय डोंबिवलीचे प्रश्न सुटणार नाही का? मनसेचा आदित्य ठाकरेंना प्रश्न

Aaditya Thackeray - Raju Patil

मुंबई : डोंबिवली हे समस्यांचे, प्रदूषणाचे भीषण ठिकाण बनत चालले आहे. वारंवार आवाज उठवूनही डोंबिवलीतील समस्या कमी होण्याचे काही संकेत नाहीत. डोंबिवलीत कधी गुलाबी पाऊस पडतो तर कधी रस्ते निळे पडतात. प्रदूषणाच्या विळख्यात डोंबिवली अडकली आहे. रासायनिक पाण्यामुळे रस्ते गुलाबी होण्याची समस्या मिटते ना मिटतो तोच आता पुन्हा एकदा रसायनमिश्रित पाण्यामुळे येथील रस्ते निळे होऊ लागले आहेत.

कारखान्यांमधून रस्त्यावरच हे निळं पाणी सोडण्यात येत असल्याने ही समस्या उद्भवली.  त्यामुळे डोंबिवलीकरांची डोकेदुखी वाढली आहे. अधिकारीही या समस्येकडे लक्ष देत नसल्याने आता अधिकाऱ्यांना धुतल्यावरच हा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विचारला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून डोंबिवलीतील प्रदूषणाकडे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं लक्ष वेधलं आहे.

डोंबिवली एमआयडीसीत प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नेहमी असते. आठ  महिन्यांपूर्वी केमिकलमुळे रस्ता गुलाबी झाल्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्याची दखल घेतली होती. स्वतः पाहणी करून प्रशासनाला आणि कंपनी मालकांना ताकीद देऊन सूचना केल्या होत्या. मात्र अनलॉकमध्ये कंपन्या सुरू झाल्यानंतर परत केमिकलमिश्रित पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे.

यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, असं राजू पाटील यांनी सांगितलं. एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने हा प्रकार घडत आहे. एमआयडीसी परिसरातील कल्याण-शीळ रोडला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर निळ्या रंगाचे पाणी पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या रसायनमिश्रित पाण्यातून चालताना त्वचेचे आजार होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. या अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काही होणार नाही का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER