… आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना – मनसे

Sandeep Deshpande-Fadnavis-CM Thackeray

मुंबई : स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे उपलब्ध करुन देण्याच्या मुद्दावरुन सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुकवरुन जनतेला सांगितले की, केंद्राकडून हव्या तितक्या गाड्या मिळत नाहीत, असे सांगितले. त्याला राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

राज्य आणि केंद्रामध्ये सुरु झालेल्या या राजकारणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी – केंद्राच्या आणि राज्याच्या भांडणात जनतेची स्थिती “आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना” अशी झाली आहे असे टि्वट केले.

उद्धव ठाकरे काल म्हणाले होते, गाड्या, जीएसटीचा वाटा मिळत नाही. स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे पैसे अजून मिळालेले नाहीत. राज्यातील स्थिती राजकारण करण्याची नाही, पण काहीजणांना परिस्थितीचं गांभीर्य कळलेले नाही. मी कुणाविषयी बोलतोय, हे जनतेला कळाले असेल.

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेल राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले – रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला ५२५ ट्रेन देण्यात आल्या आहेत, ज्यामधून ७ लाख ३० हजार श्रमिकांनी प्रवास केला आहे. जितक्या ट्रेन मागितल्या जात आहेत, त्यामध्ये स्वत: रेल्वे मंत्री लक्ष घालत असून ट्रेन पुरवत आहेत. अनेकदा रात्री उशिरा यादी पाठवल्यानंतरही ट्रेन दिल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री तसेच इतर शिवसेना नेत्यांनी केलेले वक्तव्य पूर्ण राजकारण आहे. आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप वाईट आहे. देशातील कोरोनाचे ३० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्र सरकार पूर्पणपणे अपयशी ठरलं आहे. सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत असून हे चूक आहे. रेल्वे मंत्री आणि मंत्रालयाने महाराष्ट्राला वारंवार मदत केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राजकारण करणे बंद केले पाहिजे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER