भाजपचा राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या नेत्याला दिली उमेदवारी

Raj Thackeray

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून, भाजपने आज सकाळी चौथी यादी जाहीर केली आहे. यावेळी भाजपने धक्कातंत्राचा वापर केल्याचं दिसून आलं आहे. कारण भाजपने विद्यमान आमदारांसह काही मंत्र्यांनाही घरी बसवले आहे. तर नाशिक पूर्वमधून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

राहुल ढिकले हे माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशानंतर राहुल ढिकले हे नाशिक पूर्वमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. ऐन निवडणुकीत प्रदेश उपाध्यक्षाने पक्ष सोडल्याने नाशिकमध्ये मनसेची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता, या महत्त्वाच्या नेत्यांची नावं नाहीत. मात्र विद्यमान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघासाठी अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे एकप्रकारे वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

भाजपकडून नुकताच जाहीर झालेल्या चौथ्या यादीत मुक्ताईनगर येथून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, काटोलमधून चरणसिंग ठाकूर, तुमसरमधून प्रदीप पडोले, नाशिक पूर्वमधून राहुल धिकाले, बोरिवलीमधून सुनील राणे, घाटकोपर पूर्वमधून शहा, आणि कुलाबा मतदार संघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने चौथ्या यादीत सात जागांची घोषणा केली आहे. यामध्येही एकनाथ खडसे यांच्यासह विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना स्थान देण्यात आलेलं नाही. तर कुलाबामधून रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे