भाजपसोबत युतीबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया

Nitin Sardesai-Fadnavis

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे भाजपसोबत युती करणार का, याबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘फडणवीस यांनी एका वेगळ्या प्रश्नावर उत्तर देताना जे वक्तव्य केलेय यामुळे पालिका निवडणुकीसाठी त्यांनी हात पुढे केलाय की नाही हे आताच सांगता  येणार नाही. याबाबतचे निर्णय राज ठाकरेच (Raj Thackeray) घेत असतात.

 आज याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच मनसेचा जन्मच भूमिपुत्रांसाठी, मराठीसाठी झालाय.  यामुळे याबाबत कोणालाही शंका घ्यायचं कारण नाही. अमराठीचा मुद्दा हा गैरसमजातून आलाय.  मराठीचा आदर अमराठी लोकांनी करावा. आम्ही काही मुद्दामहून कोणाला मारहाण करत नाही.

मराठीचा मुद्दा मनसे कधीही डावलणार नाही, असेही सरदेसाई म्हणाले आहेत. मनसे आणि भाजपची युती झाली तर राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीनंतर भाजप-मनसेच्या युतीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. मनसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

दरम्यान गेल्या काही निवडणुका महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकत्र लढवल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीबाबतदेखील चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे आगामी काळातदेखील एकत्र निवडणूक लढण्याची चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER