मराठी माणसासाठी मनसे नेहमीच तत्पर, ८ वर्षांपासून छळ करणारा अधिकारी अटकेत

Maharashtra Today

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सिग्नल विभागात काम करणाऱ्या 35 वर्षीय महिलेचा शारीरिक छळझाल्याचं समोर आलं आहे. आठ वर्षांपासून हा छळ सुरू होता. पण अनेकदा तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. उलट महिलेचीच बदली करण्यात आली. पण बदलीनंतरही तिचा छळ सुरू होता. या प्रकरणी अखेर महिलेनं रेल्वे पोलिसांत तक्रार दिली. रेल्वे पोलिसांवरही दबाव निर्माण करण्यात आला पण त्याला बळी न पडता पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली. मात्र या महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं(MNS) पुढाकार घेतला होता हे विशेष.

‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, अपुल्या घरीच हाल सोसते मराठी. हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी’ ही कविवर्य सुरेश भटांची कविता पोस्ट करत ८ वर्षांपासून सुरू असणाऱ्या छळाविरुद्ध तिने अखेर धीर एकवटला आणि लढा दिला असे म्हणून मनसेने संबंधीत महिलेच्या धाडसाचे कौतुक केले.

मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच तत्पर राहते. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कामगाराच्या शोषण प्रकरणी “महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना, पश्चिम रेल्वे” ह्यांनी डीआरएमकडे तीव्र निषेध नोंदवित कठोर शिक्षेची मागणी केली होती. अखेर मनसेचं पुढाकाराने त्या छळ करणाऱ्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.