‘मनसे’ला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण; ‘कृष्णकुंज’वर तणाव

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेत लढली नाही. विधानसभेत लढली तर अत्यंत मोठ्या पराभवाला त्यांना सामोरे जावं लागत आहे. विधानसभेच्या पराभवानंतर आणि महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून मनसे एक्टीव्ह झाल्याचे दिसत असतानाच मनसेला अंतर्गत ग़बाजीचं ग्रहण लागलेलं दिसत आहे.

मनसेच्या अंतर्गत गटबाजीमुळेच मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी राजीनामा दिला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि नेते अभिजीत पानसे यांच्या मनमानीला कंटाळून पक्षातून बाहेर पडत असल्याचे काळे यांनी राज ठाकरेंना लिहीलेल्या पत्रांतून सांगितले आहे.

गजानन काळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला.

बाहेरच्या शक्तीकडून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न; भाजप आमदाराची पंकजा मुंडेंना साथ

त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील आणि गजाजन काळे यांच्यासोबत राज ठाकरेंनी बैठक घेतली. यावेळी ‘कृष्णकुंज’वर गजानन काळे आणि अविनाश जाधव यांचे समर्थक एकमेकांना भिडले. त्यामुळे काही काळ कृष्णकुजवर तणावाचे वातावरण होते.

येत्या काही महिन्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच गजानन काळे यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात काम करणं मला अशक्य आहे. परंतु एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी कायम राहणार आहे. आपल्या नेतृत्वावर कायम विश्वास आणि प्रेम असल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचारही मनाला शिवलेला नाही, असं काळेंनी स्पष्ट केलं.