राज्यभरात मनसेच्या ‘हाय व्होल्टेज’ मोर्च्यांना सुरुवात; अनेक ठिकाणी मनसैनिकांची धरपकड

mns

मुंबई :- लॉकडाऊन काळात सामान्य जनतेला पाठवलेल्या वाढीव वीज बिलाविरोधातील आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उडी घेतली आहे. मनसेने गुरुवारी राज्यभरात ‘झटका मोर्चा’चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यांत मनसेचे (MNS) कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्च्याला  परवानगी नाकारली असल्यानं मनसैनिकांची धरपकड सुरू झाली आहे.

आता जनतेला न्याय देण्यासाठी आज संपूर्ण राज्यात मनसेनं मोर्च्याचं आयोजन केलं आहे. संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्च्यामध्ये लाखो लोक सामील होतील, असे नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आले आहे.

मुंबईतील वांद्रे येथे मनसेने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आपलं काम करतात, आम्ही आमचं काम करतो आहे. आम्ही आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ. त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान, जर त्यांचं सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) पुढील भूमिका तयार आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

औरंगाबाद : मनसेचं आंदोलन चिरडलं

औरंगाबाद शहरात मनसेचं आंदोलन पोलिसांनी चिरडलं आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. महात्मा फुले चौकातून मोर्चा जाऊ दिला नाही. दुसरीकडे, ठाण्यात मनसैनिकांची धरपकड सुरू  झाली आहे.

पुण्यात पोलिसांनी मोर्चा रोखला

पुण्यात वाढीव वीजबिलाविरोधातला  मनसेचा मोर्चा  पोलिसांनी रोखला आहे.  महामोर्च्यातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेकडो मनसैनिकांना फरासखाना पोलीस ठाण्यात आणले. मनसेची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी  पोलीस स्टेटशनमध्ये सुरू आहे.  मनसे मोर्च्यामध्ये सरकारला शॉक देण्यासाठी काही युवकांनी अंगाला वायर गुंडाळाल्या आहेत. फरासखाना पोलीस ठाण्यात मनसेने धरणे आंदोलन सुरू केलं. जिल्हाधिकारी यांनाच इथं बोलवा नाही तर आम्हाला ताब्यात घेऊ नका, अशी मागणी करण्यात आली आहे.

मनसेचे कार्यकर्ते जसे शनिवार वाड्याजवळ पोहचताहेत तसे पोलीस त्यांना ताब्यात घेऊन गाडीत घालून पोलीस स्टेशनला नेताहेत. मनसेच्या मोर्च्याला परवानगी नसल्याने कारवाई होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं तर पोलिसांनी आज सकाळी परवानगी नाकरल्याचं  मनसे नेत्यांचं  म्हणणं. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आपण पोलीस स्टेशनमध्येच आंदोलन सुरू करणार असल्याचं मनसे नेत्यांनी म्हटलं आहे.

ठाण्यात कलम १४४ लागू

वाढीव वीज बिलासंदर्भात ठाण्यातदेखील मनसैनिक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांकडून कलम १४४ लागू, जमावबंदी आणल्याने मनसेला मोर्च्यासाठी परवानगी नाकारली आहे. मात्र मनसे आपल्या आंदोलनावर ठाम आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकार मनसेला घाबरते, आमच्या मोर्चाला परवानगी का नाही ? 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER