अखेर मनसेने घेतला १०० जागांवर लढण्याचा निर्णय

raj bhau

मुंबई :- लोकसभा निवडणुका लढवण्यापासून अलिप्त राहिलेली मनसे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरणार यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अखेर आज पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावरील चर्चांना पूर्णविराम दिला. आज मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी मनसे १०० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचीही माहिती आहे.

मनसे उमेदवार देत असलेल्या या १०० जागांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि काही ग्रामीण मतदारसंघाचा समावेश असेल. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, आम्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचेही मत जाणून घेतले. सर्वांनीच निवडणुका लढवण्याच्या बाजूने कौल दिला. आम्ही ही बाब राज ठाकरेंसमोर ठेवू. आम्हाला आशा आहे की ते कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून योग्य निर्णय घेतील.

‘मनसे’मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष १०० जागांवर लढणार असला तरी मुख्य लक्ष हे २५ जागांवरच असेल. या जागा मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे आणि पंढरपुरातल्या असतील. या जागांवर भाजपविरोधी पक्षांकडून सहकार्य मिळवण्यासाठीही प्रयत्न केले जातील. याबदल्यात मनसेकडून या पक्षांना सहकार्य करण्यात येईल. सध्या आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या राज ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे.

विधानसभेत पूर्ण ताकदिनिशी उतरण्याकरताच राज यांनी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्याचे राजकीय वातावरणही त्यांच्यासाठी फार अनुकूल नसल्याचे मत काही पक्ष नेत्यांचे आहे. तर, काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार ही निवडणूक न लढल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि ते पक्षापासून लांब जाऊ शकतात. एक राजकीय पक्ष या नात्याने निवडणुकीला सामोरे जाऊन लोकांना पर्याय देणे आपले काम आहे. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर राज यांनी अखेर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मोर्चे बांधणी केली जात आहे.