मनसेला कोरोनाच्या रुग्णवाढीवर शंका; केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crisis) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातच अमरावती आणि नगर येथील खासगी प्रयोगशाळांतील चुकीच्या अहवालाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. हा प्रकार गंभीर आणि संशयास्पद आहे. त्यामुळे केंद्रीय पथकामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा (Sumit Varma) यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

नगरमध्ये एका रुग्णाचा एकाच दिवशी खासगी आणि सरकारी प्रयोग शाळेतील अहवाल वेगळा आला होता. हे प्रकरण आता मनसेने उचलून धरले आहे, यासोबतच अमरावती येथील प्रकाराचीही तक्रार केली आहे. वर्मा यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून जगभर थैमान घालणारा कोरोना भारतात जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत बऱ्यापैकी आटोक्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून करोनाने अचानक डोकं वर काढले. त्यात अमरावती जिल्ह्यातील घटनेने सर्वत्र खळबळ उडवली. फक्त आठ दिवसांत हजारोंच्या संख्येने करोनाच्या रुग्णांची तेथे भर पडली. नंतर चौकशी केली असता तेथील ११ खसागी प्रयोग शाळांचे अहवाल चुकीचे असल्याचे उघड झाले. हा लोकांच्या जीवाशी आणि भावनांशी मोठा खेळ आहे. लोकांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक नुकसानाला सामोरे जावे लागले. त्या अकरा प्रयोग शाळांची मान्यता रद्द करण्यात आली.

आता नगरमध्ये असाच प्रकार घडला आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा-वीस दिवसांत हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढले आहेत. एका रुग्णाने दोन ठिकाणी केलेल्या चाचणीचे अहवाल वेगळे आले. त्यामुळे संशय निर्माण झाला आहे. याशिवाय खासगी प्रयोग शाळेत तातडीने अहवाल मिळतो आणि सरकारी प्रयोग शाळेत तोच मिळण्यासाठी दोन ते ती दिवस लागतात, याचे नेमके कारण काय, हाही संशयच आहे. खाजगी प्रयोगशाळेतील रुग्णांचा सकारात्मक अहवालाचा टक्का हा शासकीय प्रयोगशाळेतील अहवाल अपेक्षा किती तरी पटीने जास्त आहे. मग नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कशावर? जर अमरावती जिल्ह्यामध्ये प्रयोगशाळेत फसवणूक होऊ शकते तर नगर जिल्ह्यात ही घटना घडणार नाही असे कशावरून? राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ज्या रुग्णांनी खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली आङे, त्यांती पुन्हा सरकारी प्रयोग शाळेतही तपासणी करावी, अशा आदेश जर आरोग्य मंत्रालयाने दिला तर अनेक प्रयोगशाळांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे, असेही वर्मा यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : मुंबईत कोरोना वाढल्याने राकेश रोशन कुटुंबासह गेला लोणावळ्याच्या बंगल्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER