मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगणाऱ्यास १००१ रुपयाचं बक्षिस देऊ – मनसे

Sandeep Deshpande & Uddhav Thackeray

मुंबई :- ‘मुख्यमंत्री उद्धव (CM Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भाषणाचा जो कोणी अर्थ समजावून सांगेन त्याला आम्ही १००१ रुपयाचं बक्षिस देऊ’, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ते रेल्वे सुरू करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पण यातलं काहीच कळलं नसल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

वास्तविक पाहता, लोकल सुरू करण्याच्या मुद्दा मनसेनं अनेक दिवसांपासून उचलून धरला आहे. यासाठी वारंवार ठाकरे सरकारला लक्ष्य केले जात आहे. यातच रविवारच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरही मनसेकडून (MNS) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘राज्याच्या डॉक्टर आणि कंपाऊंडरने पेशंटची वाट लावली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे म्हणतात २१ ऑक्टोबरला रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न करू तर दुसरीकडे राजेश टोपे म्हणतात नोव्हेंबर अखेरीस सर्व सुरू होईल. म्हणजेच या सरकारमध्ये समन्वय नाही’ अशी टीका यावेळी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना लोकांची गर्दी नको असेल तर त्यांनी घरातच थांबावं. मात्र, सर्वसामान्य जनतेला पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर जायचं आहे. बँकेचे हफ्ते फेडायचे आहेत. याकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ही बातमी पण वाचा : ‘आरे’ चा लढा यशस्वी; अमित ठाकरेंनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER