चंद्रपूरात शेट्टी टोळीकडून मनसे नगरसेवकाला धमक्या, राज ठाकरे करणार तक्रार

Raj Thackeray

चंद्रपूर : चंद्रपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नगरसेवक सचिन भोयर (Sachin Bhoyar) यांना शहरातील मद्रासी नागरिकांकडून सतत धमक्या मिळत आहेत. ही बाब भोयर यांनी राज ठाकरे यांना सांगितली. त्यावर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी मी बोलतो, असे आश्वासन राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोयर यांना दिले आहे.

चंद्रपूर येथे सचिन भोयर हे बंगाली कॅम्प भागाचे विद्यमान नगरसेवक आहेत. शहरात वास्तव्यास असलेल्या मद्रासी लोकांनी येथे एक टोळी तयार केली असून, ‘शेट्टी टोळी’ नावाची परिसरात मोठी दहशत आहे. या टोळीने झोपडपट्टी परिसरात उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. या प्रकाराची तक्रार सात नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. त्यामध्ये सचिन भोयरही आहेत. भोयर यांनी राज ठाकरेना ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भोयर पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या टोळीच्या उच्छादापासून झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची सुटका होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

सर्व सात नगरसेवकांनी शेट्टी टोळीला आवर घालण्याची मागणी केली आहे. शहरातील इंदिरानगर, श्यामनगर, रयतवारी परिसरातील झोपडपट्टीत मोठ्याप्रमाणात मजूर वर्ग राहतो. याच भागात आंध्र प्रदेश, तेलंगणातील गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसांनीही निवारा शोधला आहे. यातील काहींचे अवैध धंदे आहेत. विशेषत ‘शेट्टी’ या आडनावाच्या व्यक्तींची गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच दहशत आहे. चोरी, लुटमार, नागरिकांना मारहाण, दारूचा अवैध व्यवसाय त्यांच्याकडून उघडपणे सुरू आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्याच्या घरावर टोळी शस्त्रांसह हल्ला चढवते. त्यामुळे या भागातील लोक त्यांच्याशी वाद घालायला घाबरतात. त्यामुळे या टोळीची हिंमत वाढली आहे.

आता सर्वपक्षीय नगरसेवकांनी शेट्टी टोळी विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. मनसेचे नगरसेवक सचिन भोयर , काँग्रेसचे अमजद अली, संगीता भोयर, अपक्ष अजय सरकार, भाजपचे चंद्रकला सोमाय, वंदना जांभूळकर, जयश्री जुमडे यांनी या शेट्टी टोळीच्या मुसक्या आवळण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER