राज ठाकरेंनी कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना दिला धीर

मुंबई :- राज्यात कोरोनाने (Corona Virus) थैमान घातले आहे. या संकटमय काळात कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांत्वन केले. राज ठाकरे यांनी दुःखात बुडालेल्या अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या घरी वैयक्तिक पत्र पाठवून त्यांना धीर दिला.

कुटुंबातील सदस्याचे कोरोनामुळे निधन झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे स्वतः राज ठाकरे यांनी घरी पत्र पाठवून सांत्वन केले. प्रत्येक विभाग अध्यक्षावर हे पत्र कार्यकर्त्याच्या घरी पोहचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. माहीम विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आज त्यांच्या विभागातील पत्रे  घरी पोहचवली.

राज ठाकरेंचे पत्र :
आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करू शकतो. इतक्या वर्षांचं आपलं नातं क्षणार्धात अनंतात विलीन झालं. हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे.

परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा.

आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबीय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना.

ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो.

आपला नम्र
राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button