एका नगरसेवकाच्या कुटुंबियांची ही अवस्था, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय?; मनसेचा सवाल

मनसेने फोडली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी;अंत्यविधीला रुग्णवाहिका न मिळाल्याने संताप

CM Uddhav Thackeray - Raj Thackeray
  • एका नगरसेवकाच्या कुटुंबियांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होत असेल असा प्रश्न नगरसेवक मोरे यांनी उपस्थित केला.

पुणे : लॉकडाऊन (Lockdown) हटवल्यानंतर देशभरासह राज्यातील अनेक शहरांत कोरोनाची (Corona) स्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. पुरेशा सोयीअभावी, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, प्रशासनाच्या नाकर्तपणामुळे अनेक मोठ्या शहरातील नागरिकांना कोरोनामुळे प्राण गमावण्याची वेळ येत आहे. कोणाला वेळेत आयसीयू बेड नाही तर कोणाला रुग्णवाहीका नाही अशी मोठ मोट्या शहरांची स्थिती आहे.

पुण्यात (Pune) कोरोना रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहीका न मिळाल्याने नागरिकांचा प्रचंड मनस्ताप झाला. या पार्श्वभूमीवर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रशासनाविरोधात चिड व्यक्त करत वसंत मोरे या यांनी पुणे महापालिकेच्या वेहिकल डेपोचे उपायुक्त नितीन उदास (Nitin Udas) यांची गाडी फोडली.ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पालिकेच्या आर्ट गॅलरीमध्ये घडली.

मनसेचे (MNS) नगरसेवक वसंत मोरे यांच्या नातेवाईकाचा रविवारी मृत्यू झाला. त्यांनी उपचारासाठी पुणे महापालिकेकडून रुग्णवाहिका मिळावी यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. तब्बल चार तास त्यांना रुग्णवाहिकेची वाट पहावी लागली. परिणामी अत्यंसंस्काराला उशिर व स्मशानभूमीतही वेटींगवर ताटकळावे लागले.

रुग्णालय ते स्मशानभूमी हे केवळ एक ते दीड किलोमिटरचे अंतर आहे. मात्र तरीही रुग्णवाहीकेसाठी चार तास वाट पाहावी लागली. एका नगरसेवकाच्या कुटुंबियांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होत असेल असा प्रश्न नगरसेवक मोरे यांनी उपस्थित केला. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांसाठी वेळेत रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा पुरविता येत नसतील तर त्यांनाही चांगल्या गाड्यांमधून फिरण्याचा अधिकार नाही असे मोरे म्हणाले.

एकीकडे प्रशासन सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करीत आहे परंतु दुसरीकडे मात्र सर्व सामान्यांना प्रशासकीय नाकर्तेपणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक मोरेंनी संताप व्यक्त करत ट्रिपल डेपोचे प्रमुख नितीन उदास यांची गाडी फोडली. तसेच, आज मी माझा संताप व्यक्त केला आहे. उद्या नागरिक रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करतील नागरिकांनी उग्र रूप धारण करण्याआधी शासनाने व पालिका प्रशासनाने व्यवस्था सुधारावी असे आवाहन नगरसेवक मोरे यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER