जेवायला ‘मातोश्री’वर जायचे की ‘वर्षा’वर? ‘शिवभोजन’वरून ‘मनसे’चा हल्लाबोल

मुंबई : ‘शिवभोजन’ योजनेवरून ‘मनसे’ने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ‘शिवथाळी’ सुरू करण्यात आली असून, ही ‘शिवथाळी’ नक्की कोणासाठी आहे? असा सवाल आज शुक्रवारी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. राज्यातील १४ कोटींपैकी १८ हजार लोकांना ‘शिवथाळी’ मिळणार असेल, तर बाकीच्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन जेवायचे की ‘वर्षा’वर जाऊन? असा सवालही त्यांनी केला. ‘वर्षा’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान आहे, हे येथे उल्लेखनीय.

आज एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ‘शिवभोजन’वरून हा हल्लाबोल केला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवभोजन योजनेची घोषणा केली होती. दरम्यान, महाविकास आघाडीच्या खातेवाटपावरही संदीप देशपांडे यांनी टीका केली. वृत्तवाहिनीशी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, राज्यात सुमारे ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, सरकार खातेवाटपातच गुंतलेले आहे. या सरकारने खातेवाटपाआधीच बंगले वाटप केले. यावरून हे सरकार किती गंभीर आहे, हे दिसून येते.