पाच नगरसेवकांसाठी रुसले तसे गोरगरिबांसाठी रुसा; मनसेचा शिवसेनेला टोला

MNS attacks Shiv Sena

नवी मुंबई : ‘ज्याप्रमाणे पाच नगरसेवकांसाठी रुसून बसलात त्याचप्रमाणे गोरगरिबांच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा रुसा आणि महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सगळ्या कोरोनाबाधित रुग्णांना देण्याबाबतचा निर्णय घ्या.’ अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्रातील गोरगरीब आणि असहाय जनतेस अनेक आजारांवर पुरेशी शासकीय मदत मिळवून देणारी एक उत्तम योजना आहे. मात्र हीच योजना कोरोनाबाधित रुग्णांसाठी कुचकामी ठरत आहे. या योजनेतील अटीनुसार जर कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र सरकारी आकडेवारीचा अभ्यास करता एकूण रुग्णांपैकी १/२ टक्का रुग्णांनाही व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत नाही. याचाच अर्थ ही योजना महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या एक टक्का रुग्णांनाही फायद्याची ठरत नाही.

त्यातच शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक किंवा दोनच खाजगी रुग्णालये या योजनेखाली आणल्याने ग्रामीण भागातील जनतेला याचा अजिबात लाभ मिळू शकत नाही, असं मनसेनं पत्रात म्हटलं आहे. ‘महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतून महाराष्ट्रातील १ लाख २२ हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री व मंत्रिमंडळातील सहकारी राजेश टोपे यांनी केला आहे. मुळातच आपल्याला कल्पना असेल व आपण माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना ही कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच त्या रुग्णाला लागू पडते किंवा त्याला मोफत उपचार मिळतात याचे शेकडो अनुभव महाराष्ट्रातील जनतेला आले आहेत.’ असंदेखील या पत्रात म्हटलं आहे.

महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचा हेल्पलाईन नंबर आणि टोल फ्री नंबर १५५३८८ यावर कॉल केल्यावर हीच माहिती दिली जाते (ती ऑडिओ क्लिपही आम्ही आपल्याला या पत्रासोबत पाठवली आहे; ती आपण जरूर ऐका.). हे असतानाही आरोग्यमंत्री असा दावा कसा करू शकतात, हा भाबडा प्रश्न आम्हाला पडला आहे- असं या पत्रात म्हटलं आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख ७० हजार कोरोनाबाधित रुग्ण असताना १ लाख २२ हजार कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचार महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतून कसे मिळाले की इतके रुग्ण व्हेंटिलेटर वर होते?’ असा प्रश्नदेखील मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER