मनसे – सेना युद्ध थांबेना! आता लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावरून मनसेचा ठाकरे सरकारला टोला

Sandeep Deshpande - CM Uddhav Thackeray

मुंबई : मुंबईत सर्वसामान्यासाठीही आता लोकल सुरू केली आहे. मात्र, लोकल ट्रेनचे (Local Train) वेळापत्रक पाहता पीक टाईम सोडून इथे लोकल धावणार आहेत. त्यामुळे अनेकजण ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) निर्णयावर सोशल मीडियाद्वारे खोचक टीका करत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनही (MNS) ठाकरे सरकारवर लोकलवरून टीकास्त्र सोडले आहे.

कोरोनासोबत (Corona) सरकारचा ऐतिहासिक करार झाला आहे. त्यामुळेच ठरावीक वेळेतच लोकलमधून फिरण्याचे कोरोनाने आश्वासन दिले आहे, असे ट्वीट मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केले.

‘खुशखबर… करोनाबरोबर सरकारचा ऐतिहासिक करार… ठरावीक वेळेतच लोकलमधून फिरण्याचे करोनाचे आश्वासन… जगभरातल्या डॉक्टरांना जमले नाही ते कम्पाउंडरने करून दाखवले… अभिनंदन!’ असे देशपांडे यांनी ट्वीट केले आहे. सोमपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र वेळेचे बंधन असल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे गेले 9 महिने बमद असलेली सर्वसामान्यांची जीवन वाहिनी लोकल ट्रेन फेब्रुवारीत सुरू होत आहे.