घुसखोरांची माहिती द्या, ५ हजार ५५५ रुपयांचं बक्षीस मिळवा; ‘मातोश्री’ बाहेर मनसेचं पोस्टर

MNS-Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद विभागाने पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती कळवणाऱ्यांना ५ हजाराचं बक्षीस जाहीर केल्यानंतर आता मनसेच्या मुंबई विभागानेही बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे याबाबत ‘मातोश्री’च्या बाहेर पोस्टर लावण्यात आलं आहे. वांद्रे पूर्व भागातही मनसेने घुसखोरांची माहिती देणाऱ्यांसाठी पारितोषिकाची घोषणा केली. मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रेंनी पोस्टर लावलं आहे.

‘घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा! पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकललंच पाहिजे. या मोहिमेत समोर आलेल्या माहितीची शहानिशा करुन सत्यता पटल्यावर माहिती देणाऱ्याच रोख 5 हजार 555 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. माहिती देणाऱ्याचे नाव या संपूर्ण प्रक्रियेत गुप्त ठेवण्यात येईल’ असं मनसेच्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

पुण्यात मनसेने पकडलेले संशयित बांगलादेशी नसून भारतीयच असल्याचे स्पष्ट झाले होते. पीडित कुटुंबाने पोलिसात धाव घेतल्यामुळे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मनसेने सावध पवित्रा घेत ‘शहानिशा करुन सत्यता पटल्यास’ अशी अट स्पष्टपणे लिहिली आहे.

दरम्यान, औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या शहरात किंवा आसपासच्या भागात पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर राहात असतील तर त्यांची पुराव्यानिशी माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत मिळालेली माहिती, पुरावे मनसेचे पदाधिकारी पोलिसांना देतील. पोलिसांनी खात्री आणि अधिकृतपणे शिक्कामोर्तब केल्यानंतर घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवून त्याला बक्षीस दिले जाणार आहे. घुसखोरांविषयी माहिती देण्यासाठी औरंगाबाद शहरातील आकाशवाणी चौकात कार्यालय सुरु करण्यात आले आहे.