दिनानाथ नाट्यगृहाच्या डागडुजीचे पैसे पाण्यात; 16 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप

ameya khopkar

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाच्या डागडुजीच्या निधीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला आहे.मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसंच दिनानाथ नाट्यगृहातील डागडुजीचे काही फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

अमेय खोपकर यांची फेसबुक पोस्ट :

मुंबई महापालिकेने 5 वर्षापूर्वी तब्बल 16 कोटी रुपये खर्च करुन डागडुजी केलेल्या दीनानाथ नाट्यगृहाची अवस्था बघा. डागडुजीच्या नावाखाली महापालिकेने नक्की कोणाचे खिसे गरम केले? अमेय खोपकर यांनी पोस्टमध्ये आरोप केला आहे, खरंतर 16 कोटी रुपयांमध्ये नवीन नाट्यगृह बांधून झालं असतं. पण इतके पैसे खर्च करुनही तकलादू काम केलं आहे. सध्याचं काम कधी सुरू होऊन कधी संपणार? हे सुद्धा माहित नाही. मग कलाकरांच्या पाठिशी उभं राहण्याचं नाटक सरकार का करतंय? असा सवालही अमेय खोपकर यांनी विचारला आहे. अशा वास्तूत नाट्यप्रयोगांना परवानगी देऊन सरकार काय साध्य करू पाहतंय? असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे. नाट्यगृहातील शौचालयांची अवस्थादेखील अतिशय वाईट असल्याचे पोस्टमध्ये लिहीले आहे.

अमेय खोपकर यांची फेसबुक पोस्ट मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आणि अमेय खोपकर यांच्या ट्विटर हँडलवरही शेअर करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेकडून कोणते पाऊल उचलण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER