महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा कसला? मनसेचा नवाब मलिकांना सवाल

Ameya Khopkar-Nawab Malik

मुंबई : वारिस पठाण यांच्या विवादित भाष्यावरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना तर असा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावर राहणं योग्य आहे का? असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी विचारला आहे.

ही बातमी पण वाचा:- इंदोरीकर महाराजांचा व्हिडिओ शेअर करत मनसेचा पुन्हा तृप्ती देसाईंवर निशाणा

रायगड किल्ल्यावरील या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधूत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. अजित पवारांसह अन्य जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे शिवप्रेमींनी या व्हिडीओ पोस्ट करून नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

याबाबत मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्विट केलं आहे की, आमचे असंख्य मुस्लिम बांधव आहेत, ज्यांच्यासमोर कुणी छत्रपती शिवाजी महाराज की- असं ओरडलं तरी ते आनंदानं ‘जSSय’ अशी गर्जना करतात. मग या नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा वाटतो का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अशा प्रवृत्तीच्या माणसाने राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावर राहावं हे तुम्हाला पटतं का? या पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांना त्यांचे समर्थक डायरेक्ट ‘जाणता राजा’ संबोधतात, त्या शरद पवारांना तरी असा माणूस कसा चालतो? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसला विचारण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणावर राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.