‘हा शरद पवार स्टाइल गोल तुम्ही दोनदा पाहाल’ ; ‘मनसे’चे अमेय खोपकरने शेयर केला व्हिडीओ

Amey Khopkar-Sharad Pawar

मुंबई : ज्यातील निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला. अशातच राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात कोणत्याही पक्षाला यश आलं नाही. त्यातच राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.यापार्श्वभूमीवर अनेकांनी या सत्तास्थापनेवरुन मिम्स व्हायरल केले आहेत तर अनेकांनी राजकारण्यांना कोपरखळ्या लगावल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटवरुन फुटबॉलच्या मैदानातील एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.

अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला “हा शरद पवार स्टाइल गोल आहे,” अशी कॅप्शन दिली आहे. तसेच हा व्हिडिओ तुम्ही नक्की दोनदा पाहाल असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गोल करण्याचा प्रयत्न करते. मात्र त्याची किक बॉलला न लागता हुकते आणि तो गोल फिरतो. मात्र गोल फिरुन पाय जमीनीवर टेकवताना तो फुटबॉलला लागतो आणि गोल होतो.

दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरू झालेल्या सत्तास्थापनेच्या राजकीय रणधुमाळीत सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार केंद्रस्थानी आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती . मात्र पवारांनी केलेल्या वक्तव्याने सत्तास्थापनेचा पेच वाढला आहे .