‘ठाणे’ बंद चा मनसेचा इशारा

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यामुळे मनसैनिक आक्रमक

MNS

ठाणे/प्रतिनिधी :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. 22 ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या मुद्द्यावरून ठाण्यातील मनसैनिक कमालीचे संतप्त झाले असून 22 ऑगस्ट रोजी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सरकार जबाबदार असेल असा इशाराच जाधव यांनी दिला आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठविल्याबद्दल माहिती नाही : मुख्यमंत्री

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम मशीनच्या विरोधात संपूर्ण देशभर वातावरण तापवण्याचे काम करत आहेत. यासंदर्भात त्यांनी ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली होती. राज ठाकरे यांच्या ईव्हीएम विरोधातील आंदोलनानंतर आता कोहिनुर मिलच्या संदर्भात ईडीची चौकशी लावण्याचे संकेत भाजप सरकारने दिले आहेत. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस देखील आली आहे. मात्र या नोटिसी नंतर याचे पडसाद मुंबई ठाण्यात उमटायला सुरुवात झाली आहे ठाण्यात ईडीच्या नोटिसी विरोधात आतापासून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

22 ऑगस्ट ला जर राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले तर ठाणे बंद करण्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांची बैठक देखील घेण्यात येणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंना ईडीची नोटीस म्हणजे सुडबूद्धीचं राजकारण – राजू शेट्टी

ईव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे यांनी देशभर आंदोलन केल्यामुळेच सरकार कडून हा राजकीय सूड उगवला जात असून संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून ठाण्यात यामुळे तीव्र आंदोलन छेडले जाईल असे जाधव यांनी सांगितले.

कोहिनुर प्रकरण हे २००४ सालचे आहे. मग सरकारलाला एवढ्या १५ वर्षांनंतर यासंदर्भात जाग कशी आली असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे हे देशभर ईव्हीएमच्या विरोधात करत असलेल्या आंदोलनाला घाबरून सरकारकडून अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून येत्या २२ ऑगस्ट रोजी यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

ही बातमी पण वाचा : तर ईडीने राज ठाकरेंसह मलाही नोटीस बजावली असती – संजय राऊत