मनसे कार्यकर्ते माजी आमदार वसंत गितेंच्या पार्टीला, पक्षात घेण्यास उत्सुक

Vasant Gite

नाशिक : नाशिकचे माजी आमदार आणि भाजपवासी (BJP) नेते वसंत गिते (Vasant Gite) यांच्या मिसळ पार्टीनंतर मनसेचे (MNS) कार्यकर्ते वसंत गीते यांच्याबाजूने असल्याचे दिसून आले. पक्षाचे आदेश झुगारुन पार्टीला हजर राहिलेल्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम यांनी दिला आहे.

पक्षांतराच्या चाचपणीसाठी गिते यांच्या काल (शुक्रवार एक जानेवारी) झालेल्या मिसळ पार्टीला मनसेचे अनेक नेते उपस्थित राहिले होते.

वसंत गितेंच्या मिसळ पार्टीला जाऊ नये, असे आदेश मनसेच्या नाशिक जिल्हाध्यक्षांनी दिले होते. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना गितेंच्या पार्टीला न जाण्यास मनसेने फर्मावलं होतं. परंतु वसंत गिते हे पूर्वाश्रमीचे मनसेचे आमदार आहेत. त्यामुळे गितेंना सहानुभूती देण्यावरुन मनसेत दोन गट पडल्याचं चित्र आहे.

भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदावरुन हटवल्यानंतर कार्यकारिणी सदस्यपद दिल्याने वसंत गिते नाराज असल्याची चर्चा आहे. वसंत गिते यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर समर्थकांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं. ‘मिसळ डिप्लोमसी’च्या निमित्ताने ते दुसऱ्या पक्षात जाण्याची चाचपणी करत असल्याचं सांगितलं जातं. कार्यकर्ते, समर्थक यांच्याशी चर्चा करुन वसंत गिते पुढची दिशा ठरवणार असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. .

दरम्यान, वसंत गितेंसमोर सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पर्याय खुले आहेतच. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करण्याबाबतही ते विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वसंत गिते पक्षांतराचा मुहूर्त साधण्याची चिन्हं आहेत. तर गितेंच्या मिसळ पार्टीला हजेरी लावून मनसे कार्यकर्ते त्यांना पक्षात घेण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER