शिक्षक, पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व, भाजपचा धुव्वा

Maharashtra Legislative Council

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला (BJP) मोठा फटका बसला आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे  अरुण लाड (Arun Lad) यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत.

मतमोजणी सुरूच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे. नागपूर (Nagpur) पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस (Congress) व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी (Abhijit Wanjarri) विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बादफेरीपर्यंत पोहचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

सतीश चव्हाण यांची  बोराळकरांवर मात

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग विजयाची हॅट्रीक  पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं, असं  मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केलं. पहिल्या फेरीपासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण १,१६,६३८ मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण ५७ हजार ८९५ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

पुणे (Pune) पदवीधर मतदारसंघ अरुण लाड यांचा विजय

पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरूच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे. त्यामुळे अरुण लाड हे सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी जाणार आहेत. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३ हजार ३२१ मतं, ४८ हजार ८२४ मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी  पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

अभिजित वंजारी विजयी झाल्याचा काँग्रेसचा दावा

नागपूर पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबेंनी ट्विटरवर दिली आहे. दरम्यान नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर १ लाख ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७ चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. अभिजित वंजारी एकूण मतं ५५ हजार ९४७, संदीप जोशी एकूण मतं ४१ हजार ५४० , अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९ , नितेश कराळे ६ हजार ८८९ मतं मिळाली. विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक-२ सुरू  करण्यात आला.

पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर

पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बादफेरीपर्यंत पोहचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. विसाव्या बादफेरीअखेर जयंत आंसगावकर यांना १७ हजार ११७ इतकी मते मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रेय सावंत यांना ११ हजार १६१ इतकी मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार इथे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. त्यांना ५ हजार ८७८ इतकी मतं मिळालेली आहेत. अद्याप मतमोजणी सुरू आहे.

अमरावती (Amravati) विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार अॅड.  किरण सरनाईक ६ हजार ३९० मतं  घेत आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे ५ हजार ३८३ मतांनी द्वितीय क्रमांकावर तर शिक्षक महासंघाचे उमेदवार शेखर भोयर ५१५० मतांनी तृतीय क्रमांकावर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER