सिमेंट मिक्सरचा प्लान्ट बंद करण्याची आमदारांची मागणी

ठाणे:  हिरानंदानी इस्टेट येथे वाघबीळ गावाशेजारील खाडीकिनारी एमएमआरडीए च्या माध्यमातून रिलायंन्स कंपनीला मिळालेल्या ठेक्याद्वारे मेट्रो कास्टिंग यार्डचे काम स्थानिकांनी बंद पडले असतांना आता येथे बेकायदापणो सिमेंट मिक्सर प्लान्टचे काम सुरु असल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. त्यामुळे हा रेडी मिक्स प्लान्ट बंद करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

शनिवारी स्थानिक ग्रामस्थांनी व बेरोजगार तरुणांनी रिलायंन्स कंपनीचे काम चालू असलेल्या जागेवर जावून काम बंद पाडले होते. तसेच एका आठवड्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणो काम केले नाही व स्थानिकांना न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करून लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. त्यानंतर आता येथील सोसायटीधारकांनी आमदार सरनाईक यांना पत्रव्यवहार करीत येथील रेडीमिक्स प्लान्टचा त्रस होत असल्याचे सांगितले आहे.

त्यानुसार त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केला असून हा प्लॉन्ट बंद करण्याची मागणी केली आहे. या प्लान्टमुळे येथील हजारो रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येणार असून शाळा, रुग्णालये सुध्दा या भागात आहेत. त्यामुळे या प्लान्टचा आरोग्यावर परिणाम होऊन प्रदुषणातही भर पडत असल्याचे त्यांचे म्हणने आहे. तसेच हा प्लान्ट बेकायदेशीर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे हा प्लान्ट तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.