आमदार राहुल जगताप यांचा सामुदायिक सोहळ्यात विवाह

MLA Rahul Jagatap married

श्रीगोंदे : एकीकडे राजकीय नेते आपल्या मुलामुलींच्या लग्नात वारेमाप पैशाची उधळपट्टी करत असताना श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांनी मात्र अगदी साध्या पद्धतीने तसेच आदर्शवत वाटावा अशा रितीने सामुदायिक विवाह सोहळा केला. डॉ राहुल जगताप रविवारी डॉ प्रणोती चव्हाण यांच्याशी विवाहबद्ध झाले. या नवदांपत्याला आशिर्वाद देण्यासाठी राज्यातील दिग्गज राजकीय नेत्यांसह हजारों लोक उपस्थित होते.

पिंपळगाव पिसा येथील सावित्रीबाई महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात हा सोहळा पार पडला. यावेळी एकूण ९ जोडप्यांनी संसाराच्या वेलीवर पाऊल टाकले. त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार दिलीप गांधी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर पिचड, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, शिवसेना नेते घनश्याम शेलार, आमदार राहुल कुल व राज्यातील राष्ट्रवादीचे अनेक आमदार, आजी-माजी खासदार, माजी मंत्री, यांच्यासह राज्य व जिल्ह्यातील बडे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.