आमदार निलेश लंकेंचे अजितदादांकडून कौतुक; दिला मोलाचा सल्ला!

Nilesh Lanke - Ajit Pawar - Maharashtra Today

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh Lanka) यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. निलेश लंके यांनी भाळवणी येथे शरद पवार (Sharad Pawar) आरोग्य मंदिर उभारले आहे. या ठिकाणी कोरोनाग्रस्तांसाठी ११०० बेड्स उपलब्ध करून दिलेत. इतकेच नव्हे, तर स्वत: आमदार निलेश लंके उपस्थित राहून घरच्या माणसाप्रमाणे लोकांची काळजी घेत आहेत.

अलीकडेच त्यांचे व्हिडीओ, बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या. कोरोना सेंटरमध्येच आमदार निलेश लंके जेवण करतात. तिथेच मुक्काम करतात. सगळ्या लोकांची आपुलकीने काळजी घेतात. या कामाचे कौतुक करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निलेश लंकेंना फोन केला. ‘रुग्णांची सेवा करतोय हे वाचून, व्हिडीओ पाहून आनंद वाटला. पण स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नको, काळजी घेत जा.’ असा सल्ला अजितदादांनी निलेश लंकेंना दिला. भाळवणीच्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहेत. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणे, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामे ते करत आहेत. लंके यांच्या या कामाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. त्यांना मदतीचा ओघही सुरू झाला आहे. पहिल्या लाटेतही त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेल्या कोविड सेंटरची दखल शरद पवारांनी घेतली होती.

परदेशातून मदतीचा ओघ

प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा समावेश यामध्ये आहे. निलेश लंके यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोविड सेंटर उभारले. तसेच आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशांतून आर्थिक मदत मिळाली आहे. परदेशातून तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक मदत निलेश लंके यांना मिळाली आहे.

“केंद्रात रुग्णांचे मनोरंजन आणि रुग्णांच्या मनातील भीती घालविणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे मी स्वत: न घाबरता रुग्णांजवळ जातो. रात्री रुग्णांना काही त्रास होत आहे का, यावर लक्ष ठेवतो. येथे वातावरण जाणीवपूर्वक आनंदी ठेवले आहे.” असे निलेश लंके यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button