माढ्यात राष्ट्रवादीला झटका; काँग्रेसच्या आमदाराकडून भाजपला पाठिंबा?

Jaykumar-Gore-Pandharpur-Madha

पंढरपूर :- लोकसभा निवडणुकीला काहीदिवसच शिल्लक असतांना राजकीय घडामोडींनावेग आला आहे. अश्यातच माढा लोकसभा मतदार संघाची निवडणूक अधिकच चर्चेचा विषय ठरू लागली आहे. माण खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी तर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजित निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात दिले.

माण खटाव तालुक्यातील बोराटवाडीमध्ये काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा रात्री पार पडला. या मेळाव्याला संपूर्ण तालुक्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते हजर होते. ‘यावेळी परिस्थिती वेगळी असून आपण काँग्रेसवर जरी नितांत प्रेम करत असलो, तरी आपल्या भागाला पाणी आणण्याच्या कामाची सुरुवात रणजित निंबाळकर यांच्या वडिलांनी केली’ असं गोरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा :‘द ताश्कंद फाइल्स’चं प्रदर्शन रोखण्यासाठी काँग्रेसमधल्या बड्या कुटुंबाचा दबाव

‘ज्यांना राष्ट्रवादीला मतदान करावंसं वाटतं, त्यांनी हात वर करावा’ असं आवाहन जयकुमार गोरे यांनी केलं. मात्र कोणीही हात वर न केल्यावर ज्यांना रणजित निंबाळकर यांना मतदान करावंसं वाटतं, त्यांना हात वर करण्याचं आवाहन करताच सर्वच कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत हात वर केले. अशाप्रकारे गोरे यांनी यंदा भाजपच्या रणजित निंबाळकर यांच्या मागे राहण्याचे संकेत दिले.

त्यानंतर लगेच भाजप उमेदवार रणजित निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, उत्तम जाणकार यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी मंचावर चढून गोरे यांच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. गोरे यांनी दिलेल्या संकेतामुळे माढ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.