शिवसेनेत पुन्हा नाराजीनाट्य, पालकमंत्रीपदासाठी रायगडचे आमदार आक्रमक

मुंबई :- नुकताच महाविकास आघाडी सरकारने राज्यातील पालकमंत्रीपदासाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यात रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला न येता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने रायगडमधे शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा एकदा धुसफूस वाढली आहे. सध्या उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री असलेल्या आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे तिन्ही आमदार आणि जिल्ह्यातील पदाधिकारी नाराज झाले आहेत. ही सर्व नाराज मंडळी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचाच पालकमंत्री व्हावा अशी मागणी ते उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहेत.

शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे हे पदाधिकाऱ्यांसहमंत्रालयात दाखल झाले आहेत. ज्याचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री हा शब्द अजितदादांनी पाळावा, असं शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

भरत गोगावले म्हणाले, ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा पालकमंत्री, असा फॉर्म्युला अजित पवार यांनीच सांगितला होता मग रायगडमध्ये आमचे ३ आमदार असताना आमचा पालकमंत्री का नको? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनता आमच्या पाठिशी आहे. जनतेचीही हीच अपेक्षा आहे. त्यामुळे जनतेची अपेक्षा काय आहे हे आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील परिस्थिती पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. इथे शिवसेनेचा पालकमंत्री असावा अशी जनतेची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.