मिथुनने पुन्हा सुरु केले काम, श्रृती हसनसोबत येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

कलाकार मग तो अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) असो वा नुकताच बॉलिवुडमध्ये प्रवेश केलेला एखादा नवोदित अभिनेता वा अभिनेत्री असो आता त्यांना अभिनय क्षमता दाखवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मची (OTT platform) ताकद ओळखूनच अमिताभ बच्चन काय किंवा सैफ, सोनाक्षी काय ओटीटीसाठी सिनेमे आणि वेबसीरीजमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली आणि कामही केले आहे. केवळ केलेच आहे असे नाही तर अजूनही करीतही आहेत. नामवंत कलाकारांच्या यादीत आता मिथुन चक्रवर्ती आणि श्रृती हसन या कलाकारांच्या नावाचाही समावेश करावा लागेल. आजारपणातून उठलेला मिथुन पुन्हा एकदा कामाला लागला असून यावेळी तो एका वेबसीरीजच्या शूटिंगमध्ये बिझी झाला आहे. 80 आणि 90 च्या दशकातील मोठे नाव असलेला कलाकार मिथुन वेबसीरीजमध्ये प्रथमच काम करताना दिसणार आहे.

मिथुनचा नुकताच रामगोपाल वर्मा दिग्दर्शित 12 ओ क्लॉक सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा यशस्वी ठरला नाही. मिथुन सध्या विनोद अग्निहोत्रीच्या ‘कश्मीर फाइल्स’ मध्येही काम करीत आहे. याच सिनेमाचे मसूरीत शूटिंग सुरु असताना मिथुन आजारी पडला होता. मिथुनला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मिथुनने काही दिवस घरी आराम केला आणि आता तब्येत एकदम ठणठणीत झाल्यानंतर त्याने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आहे. मिथुन आता पुन्हा मसूरीलाच पोहोचला असून त्याने तेथे एका वेब सीरीजचे शूटिंग सुरु केले आहे. या वेबसीरीजची निर्मिती 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या राणी मुखर्जी अभिनीत ‘हिचकी’ सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा करीत आहे. तर याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मुकुल अभ्यंकरवर सोपवण्यात आलेली आहे. मुकुलने मनोज वाजपेयी आणि तब्बू अभिनीत ‘मिसिंग’ सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे.

2015 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द बेस्टसेलर शी रोट’ या पुस्तकावर ही वेब सीरीज आधारित आहे. निर्मात्यांनी वेबसीरीजचे नाव अजून नक्की केलेले नाही. या वेबसीरीजमध्ये मिथुनसोबत श्रृती हसन, गौहर खान, अर्जन बाजवा आणि अनु कपूर काम करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER