मिथुन रामगोपाल वर्माच्या हॉरर सिनेमात

12 O Clock- Ghost Inside

मसुरी येथे विनोद अग्निहोत्रीच्या ‘कश्मीर फाईल्स’ सिनेमाचे शूटिंग करताना अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आजारी पडला होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मिथुन बरा झाला असून कदाचित पुढील आठवड्यात तो पुन्हा ‘काश्मीर फाईल्स’ (Kashmir Files) शूटिंग सुरु करणार आहे. त्यानंतर लगेचच मिथुन चक्रवर्तीचा एका हॉरर सिनेमाही रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन रामगोपाल वर्माने केले आहे. बऱ्याच कालावधीनंतर रामगोपाल वर्मा हिंदी सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्वतः रामूनेच सोशल मिडियावर या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे. जानेवारी 2021 च्या दुसऱ्या आठवड्यात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.

रामगोपाल वर्माच्या या हॉरर सिनेमाचे नाव ‘12 ओ क्लॉक: अंदर का भूत’ असे असून यात मिथुनसोबत मकरंद देशपांडेही महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्यासोबत दिव्या जगदाळे, मानव कौल, अली असगर, आशीष विद्यार्थी, दलीप ताहिल, फ्लोरा सैनी आणि कृष्णा गौतमही या सिनेमात दिसणार आहेत. सिनेमाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामूने या सिनेमाचे शूटिंग कोरोना लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वीच संपवले होते. प्रत्येक कलाकाराला फक्त त्याची भूमिका सांगण्यात आली होती. पुढे काय होणार आहे याची माहिती कोणालाही दिली नव्हती. त्यामुळे सिनेमात नक्की काय दाखवले आहे हे रामगोपाल वर्माशिवाय दुसऱ्या कोणालाही ठाऊक नाही असेही सूत्रांनी सांगितले.

सिनेमाबाबत माहिती देताना रामूने सांगितले, “लोकांच्या कल्पना उत्तेजित केल्यास त्यांना आणखी भिती वाटते असे मला वाटते. त्यामुळेच मी त्यांच्या कल्पना उत्तेजित करतो. सुरुवातीपासूनच माझे म्हणणे आहे की, भिती ही एक मानसिक अवस्था आहे. प्रक्षकांच्या या मानसिक अवस्थेला हात घालणे मला आवडते. हॉरर श्रेणीचे सिनेमे मला नेहमीच आकर्षित करतात. यावेळी प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी मी वेगळे टेक्निक वापरले आहे.

या सिनेमाला संगीत दिले आहे एम. एम. क्रीम यांनी. एखाद्या हॉरर सिनेमाला संगीत देण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. रामूने या सिनेमाच्या वितरणाचे अधिकार विकले असून एकाच वेळी संपूर्ण देशात हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER