मिथिलाचं होम स्वीट होम

मिथिलाचं होम स्वीट होम

सेलिब्रिटींचं घर कसं असेल… त्या घरात किती रूम्स असतील, बाल्कनीतून दिसणारा समुद्र त्यांना रोज पाहता येत असेल ना..त्यांच्या घराच्या हॉलमधील उंची फर्निचरपासून किचनमध्ये काय शिजतंय याचीही एक वेगळीच उत्सुकता असते. खरंतर आज अशा लॅव्हीश घरात रहायला गेलेल्या अनेक कलाकारांचे बालपण जुन्या मुंबईतील चाळीत किंवा गजबजलेल्या भागात गेलेले असते. काही कलाकार तर या जुन्या घराच्या आठवणीसोबत घेऊन नव्या अपार्टमेंटमधल्या फ्लॅटमध्ये गृहप्रवेश करतात. तर अशा सेलिब्रिटी आणि त्यांचे घर हा विषय नेहमीच चर्चेचा आणि उत्सुकतेचा असतो. मराठी आणि हिंदी सिनेमांमधून नेहमीच वेगळं काहीतरी करणारी अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) हिचे मात्र तिच्या जुन्या घराशी वेगळच नातं आहे. ती आजही दादरच्या ७५ वर्षे जुन्या असलेल्या घरात आजी आजोबांसोबत राहते. नुकताच तिने या घराविषयीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

दादरमध्ये मिथिलाचं अख्खं बालपण गेलं. दादरमध्येच तिच्या आजोबांचेही घर आहे. याच घरात तिच्या अनेक आठवणीही आहेत. मिथिलाने अभिनयात चांगले नाव कमावले आहे. नाटक, वेबसिरीज, सिनेमा या माध्यमांमध्ये मिथिला सध्या काम करत आहे. आज जर आपण पाहिलं की कलाकारांना त्यांच्या कमाईतून नवं घर घ्यायला खूप आवडतं. अनेकांचं ते स्वप्नही असतं. संघर्षाच्या काळात मुंबईच्या चाळीतील दोन खोल्यांमध्ये राहिलेल्या अनेक कलाकारांनी आज मुंबईत मोठं घर घेतलं आहे. नव्या घरातील अनेक गोष्टी, फोटो ते शेअरही करत असतात. अर्थात त्यांच्या चाहत्यांनाही या गोष्टीचा अभिमान वाटतो. मिथिलाला मात्र तिच्या या जुन्या घरातच रहायचं आहे.

मिथिला सांगते, माझे ९१ वर्षाचे आजोबा, ज्यांना मी भाऊ म्हणून हाक मारते आणि ८५ वर्षाची आज्जी यांनी घेतलेलं हे घर आहे. दादरमध्ये जशी घरं आहेत तसच हे जुन्या पद्धतीचं घर आहे. या घरात आत्तासारख्या चांगल्या सुविधा नसल्या तरी या घरात माया आहे. खरंतर मला आजोबा म्हणतात, की तुझ्यासाठी हे घरं जुन्या बांधणीचं आहे. तुलाही वाटत असेल ना की नव्या घरात रहावं. तेव्हा तू तसा विचार कर आणि जेव्हा तुला इथे यावसं वाटेल तेव्हा येत जा. यावरून माझं आणि आजोबांचं भांडणही होतं. पण खरं सांगायचं तर मला या घरातून जावसं असं वाटतच नाही. माझी सगळी फॅमिली आजीआजोबांसोबत याच घरात राहते.

कोरोनाकाळात या घरात होतो म्हणूनच आजीआजोबांची काळजी घेण्यासाठी अनेकांची मदत आम्हाला मिळाली असंही मिथिला सांगते. या घराच्या शेजाऱ्यांशीही तिचे खास नाते आहे. मिथिलाचे आजोबा मधुमेहाचे पेशंट आहेत. तर आजी ज्यांना ती मम्मा म्हणते त्या ही आता थकल्या आहेत. कोरोनाकाळात लॉकडाउन होतं तेव्हा त्यांची काळजी घेत असताना या ७५ वर्षे जुन्या घराच्या अनेक आठवणी, किस्से मिथिलाला आजोबांकडून ऐकायला मिळाले. कितीही पैसे कमावले आणि नवं घरं घेतलं तरी या घराची सर त्या नव्या घराला येणार नाही असं मिथिला सांगते.

मिथिलाच्यादेखील या जुन्या घरात काही हक्काच्या जागा आहेत. दादरमधलं हे घर जुन्या स्टाइलचं असल्यामुळे घरात कोनाडे, देवळ्या आहेत. शिवाय एक झोपाळाही आहे. हा झोपाळा म्हणजे मिथिलासाठी जीव की प्राण आहे. या झोपाळ्यावरचे अनेक फोटो ती सतत तिच्या इन्स्टापेजवर अपलोड करत असते. या झोपाळ्यावर बसून तिला तिचा रिकामा वेळ घालवायला, अँपल वाजवायला खूप आवडते.

गर्ल इन द सिटी, लिटील थिंग्ज या वेबसिरीजमधील मिथिलाच्या भूमिका खूपच गाजल्या आहेत. इरफान खानसोबतचा कारवा या बॉलीवूड सिनेमातून तिने हिंदीमध्ये पाऊल टाकलं. मिथीलाच्या या भूमिकेचेही कौतुक झाले. आजच्या तरूणाईच्या रिलेशनशीपकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर बेतलेल्या मुरांबा या सिनेमात मिथिलाचा अभिनय जबरदस्त होता. तर अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवर आलेला चॉपटिक्स हा सिनेमाही हटके होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER