उद्धव ठाकरेंचे मिशन मुंबई: शिवसेना पदाधिकाऱ्यांची सलग दुसऱ्या दिवशी घेतली बैठक

CM Uddhav Thackeray

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचा (BJP) भगवा फडकेल, असा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली असून, कालपासून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज वर्षा बंगल्यावर मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपविरोधात शिवसेनेनं (Shiv Sena) नवी रणनीती आखली आहे. शिवसैनिकांनी घरोघरी संपर्क वाढवला पाहिजे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

नव मतदारांची नोंदणी करून घेण्याचे आदेश देत जनतेच्या हिताच्या नवनवीन योजना राबवा, मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सध्या भाजपच्या पूनम महाजन आहेत. त्याच मतदारसंघात आता शिवसेना पक्ष मजबूत करण्याची रणनीती आखत आहे.

या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेंनीही माध्यमांशी संवाद साधला आहे. छोटीशी बैठक घेतली म्हणजे रणनीती आखणे होत नाही. दिवाळीनिमित्त चहापानासाठी बोलावलं होतं. शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, ज्यांच्या आशीर्वादाने हे झालं आहे, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत, यासाठी बैठक घेण्यात आली. मोर्चे बांधणी नाही तर शिवसेना संघटना बांधणी करणार आहे. आमच्यामुळे काही लोक तिकडे दिसत आहेत, त्यांची जागा येत्या निवडणुकीत दाखवून देणार आहोत. आम्ही सैनिक आहोत आणि त्यासाठी आम्हाला सज्ज राहायचं आहे. युद्ध आम्ही जिंकणारच, असा विश्वासही दिलीप लांडेंनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER